कोल्हापूरात साखरेने ओलांडली चाळिशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2017 18:53 IST2017-07-16T18:52:15+5:302017-07-16T18:53:35+5:30
कडधान्य, भाजीपाल्याचे दर स्थिर : फळबाजार अद्याप थंडच

कोल्हापूरात साखरेने ओलांडली चाळिशी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : साखरेच्या दरात हळूहळू वाढ होत असून, या आठवड्यात साखरेने चाळिशी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४२ रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. कडधान्ये, भाजीपाल्याच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही. कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून मेथी, पालक, पोकळ्याचे दर मात्र स्थिर आहेत. फळबाजार अद्याप शांतच आहे.
साखर कारखान्यांच्या गळीत हंगामापासून गेले सहा महिने घाऊक बाजारात साखरेचा दर ३३ ते ३६ प्रतिकिलोपर्यंत राहिला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही ३९ रुपयांपर्यंत साखर जाऊन थांबली; पण गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या आयातीवर बऱ्यापैकी निर्बंध येणार आहेत. त्याचा तत्काळ परिणाम साखरेच्या दरावर झाल्याचा दिसून येत आहे. सध्या घाऊक बाजारात साखर ४० रुपये, तर किरकोळ बाजारात ४२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आगामी काळातही सणांच्या पार्श्वभूमीवर आणखी दरात दोन-तीन रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कडधान्य बाजार तुलनेत स्थिर आहे. तूरडाळ ७०, हरभराडाळ ७२ रुपये आहे. सरकी तेल ७०, तर शाबू ८० रुपयांवर कायम आहे. ‘जीएसटी’मुळे अजूनही व्यापारी गोंधळले असल्याने त्याचा थेट फटका कडधान्य बाजारावर दिसत आहे. एकूणच पावसाळा व जीएसटी यांमुळे कडधान्य बाजार शांत दिसत आहे. भाजीपाल्यामध्ये कोबी, वांगी, ढब्बूची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घेवडा व गवारीची आवक काहीशी मंदावल्याने दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक मर्यादित असल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात ७० रुपयांसून १२० रुपये किलोपर्यंत वाटाणा झाला. कारली, भेंडी, वरणा, दोडक्याची आवक स्थिर आहेत. कोथिंबिरीच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी कांदापात, मेथी, पालक व पोकळा फारशी चढउतार दिसत नाही.
फळ मार्केट अद्याप शांतच दिसत आहे. मोसंबी, संत्री, चिक्कंूची आवक मर्यादित आहे. पेरू व डाळिंबांची आवक चांगली आहे. ‘दशेरी’ आंबा तुरळक पाहावयास मिळत आहे. आणखी पंधरा दिवस श्रावण सुरू झाल्यानंतरच फळबाजाराला तेजी येण्यास लागणार आहे.
कांदा-बटाटा स्थिर!
बाजार समितीत आठवड्याला साधारणत: २५ हजार क्विंटल कांद्याची, तर १५ हजार क्विंटल बटाट्याची आवक होते. आवक व मागणी स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.