शाहूंच्या स्मारकासाठी आंदोलनाचाच पर्याय
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T00:10:19+5:302015-07-25T01:13:30+5:30
श्रीमंत शाहू महाराज : घरचेच असल्याचे समजून कमी महत्त्व दिले जात असल्याबद्दल खंत

शाहूंच्या स्मारकासाठी आंदोलनाचाच पर्याय
कोल्हापूर : शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या बाबतीत कोणी अडथळे आणत असेल, तर त्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशा शब्दांत श्रीमंत शाहू महाराज यांनी शुक्रवारी राज्य सरकारला इशारा दिला. शंभर वर्षांपूर्वी ज्यांनी देशाच्या प्रगतीला दिशा दिली ते शाहू महाराज घरचेच आहेत, असे समजून त्यांच्याकडे कमी लक्ष दिले जात आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.
कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या कामाचा प्रारंभ शुक्रवारी दुपारी श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री हसन मुश्रीफ होते.
शाहू महाराजांची उत्तर प्रदेशात भव्य स्मारके होतात, पण महाराष्ट्रात मात्र शाहू महाराज घरचेच असल्याचे समजून कमी महत्त्व दिले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला परंतु राज्यात सत्तांतर झाल्यापासून या स्मारकाबाबतीत काहीच हालचाली होत नाहीत, असा आक्षेपही त्यांनी यावेळी नोंदविला.
शाहू महाराजांचे कार्य आणि विचार सर्वांनाच मान्य आहेत. त्यांच्या विचारांना कोणाचा विरोध असायचे कारण नाही, परंतु त्यांचे हे विचार कृतीतून किती जोमाने पुढे नेले जाईल हे पुढील काळात पाहावे लागेल तसेच आतापर्यंत शाहूंचे विचार ऐकत आलो परंतु गेल्या शंभर वर्षांत त्यांच्या विचाराने प्रगती किती झाली, याचे आत्मचिंतनही करण्याची गरज आहे, असे शाहू महाराज म्हणाले.
सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसांत टोल आणि एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्ता येऊन आठ महिने झाली तरीही टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार राजेक्ष क्षीरसागर यांना विधानसभेच्या दारासमोर उभे राहून आंदोलन करावे लागत आहे. जर आश्वासन पूर्ण केले जात नसेल तर सत्तेतून बाहेर
पडावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
यावेळी महापौर वैशाली डकरे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचीही भाषणे झाली. नगरसेवक महेश कदम व शशिकांत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर स्थायी सभापती आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपमहापौर ज्योत्सना मेढे-पवार, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, गटनेते राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, चंद्रकांत घाटगे, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, प्रकाश गवंडी, मधुकर रामाणे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शिवसेना-भाजपची उडविली खिल्ली
शिवसेना-भाजपचे स्थानिक नेते एकमेकांवर करत असलेल्या टीकेची माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अक्षरश: खिल्ली उडविली. टीकेचे संदर्भ देत मुश्रीफ यांनी सत्तेतील ही मंडळी अशी एकमेकांवर टीका करत असतील तर जनतेने कोणाकडे पाहावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनपाची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढा. कोणाची ताकद किती आहे, हे कोल्हापूरच्या जनतेला एकदा कळू दे, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.