समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध
By Admin | Updated: December 21, 2014 00:10 IST2014-12-21T00:09:24+5:302014-12-21T00:10:05+5:30
नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याने महापौरांकडे बंद लखोट्यातून दिली

समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्यपदाच्या निवडी आज, शनिवारी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध आणि निर्विघ्नपणे पार पडल्या. विशेष म्हणजे महिला व बालकल्याण समितीवर कोणी नगरसेविका जायला तयार नसताना त्यांच्या अपरोक्ष नावे जाहीर करावी लागली.
महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सभाध्यक्ष महापौर तृप्ती माळवी यांनी निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली. तत्पूर्वी ही नावे प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याने महापौरांकडे बंद लखोट्यातून दिली. स्थायी समितीसाठी आठ, परिवहन समितीसाठी सहा, तर महिला व बालकल्याण समितीसाठी नऊ सदस्य निवडण्यात आले. पाकिस्तानातील पेशावर येथील दहशतवादी हल्ल्याचा सभेत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पापांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनाही सभागृहाने श्रद्धांजली अर्पण केली. ताराबाई पार्क येथील कारंडे मळ्याला जाणाऱ्या रस्त्याला तसेच तेथील उद्यानाला गायकवाड यांचे नाव देण्याचा सदस्य ठराव मंजूर झाला.
स्थायी समिती सदस्य
जयश्री राजेंद्र साबळे (काँग्रेस), सर्जेराव श्रीपतराव पाटील, प्रकाश आनंदराव गवंडी, ज्योत्स्ना बाळकृष्ण पवार-मेढे, माधुरी किरण नकाते (सर्व राष्ट्रवादी कॉँग्रेस), मृदुला रमेश पुरेकर (जनसुराज्य), संभाजी रमेश जाधव (शिवसेना), प्रभा सुनील टिपुगडे (भाजप).
परिवहन समिती
अजित विलासराव पोवार, शशिकांत धोंडिराम पाटील (कॉँग्रेस), रेखा अनिल आवळे, शारदा संभाजी देवणे (राष्ट्रवादी), अरुणा दत्ताजी टिपुगडे (शिवसेना), प्रकाश रामचंद्र नाईकनवरे (जनसुराज्य आघाडी).
महिला व बालकल्याण
लीला धुमाळ, अपर्णा आडके, दीपाली ढोणुक्षे, संगीता देवेकर (कॉँग्रेस), रोहिणी काटे, रेखा आवळे, कादंबरी कवाळे (राष्ट्रवादी), यशोदा मोहिते (जनसुराज्य आघाडी), पल्लवी देसाई (शिवसेना-भाजप आघाडी). (प्रतिनिधी)