चिपळूण, राजापुरात पाणीच पाणी
By Admin | Updated: July 13, 2016 00:50 IST2016-07-12T18:59:25+5:302016-07-13T00:50:26+5:30
पावसाचा कहर : विश्रांती घेतलेल्या पावसाचा पुन्हा जोरदार तडाखा
चिपळूण, राजापुरात पाणीच पाणी
ओसरलेले पाणी पुन्हा बाजारपेठेत! चिपळुणात पूरसदृश स्थिती कायम
राजापूर : रविवारी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने तालुक्यातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत होते. राजापूर शहर बाजारपेठेत आलेला पूर रविवारी रात्री ओसरला. मात्र, पावसाने जोर वाढवल्याने सोमवारी दुपारी पुराचे पाणी शहरातील बाजारपेठेत पुन्हा शिरले.
सोमवारी सकाळी समस्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडून साफसफाई केली. अनेक दुकानात पुराचे पाणी भरल्याने गाळ दुकानात साचला होता तो साफ करण्यात आला. सोमवारपासून नियमित व्यवहार सुरु झाले. सकाळपासून जवाहर चौकाकडे येणारी वाहतूक सुरु झाली होती .
पावसामुळे तालुक्यात फारसे नुकसान झाल्याची नोंद नसली तरी महावितरणाला याचा चांगलाच फटका बसला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून तालुक्यातील काही भागातील वीज गायब झाली आहे.
सकाळनंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे दुपारच्या सुमारास राजापूर बाजारपेठेत पुन्हा अर्जुना नदीचे पाणी शिरले आणि व्यापाऱ्यांची पुन्हा पळापळ झाली. सलग दुसऱ्या दिवशी पुराचे पाणी शहरात भरल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कोठेही नुकसान झाल्याची नोंद नव्हती. मात्र पुराचे पाणी वाढतच होते. (प्रतिनिधी)
चिपळूण : शहर व परिसरात रविवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने वाशिष्ठी व शीव नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयांना व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शंकरवाडी ते बाजारपूल, खाटीकआळी, शिवाजी चौक, भैरी मंदिर, वडनाका हा परिसर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पाण्याखाली होता. पेठमाप, गोवळकोट भागातही काही ठिकाणी पाणी भरले होते. सकाळी ११ नंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. पाऊस थांबला असला तरी पूर परिस्थिती कायम आहे.
शीव व वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरपर्यंत गेली आहे. शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमार्केट, नाईक कंपनी, भेंडीनाका, मंडईचा मागील भाग, शिवाजी चौक, वडनाका ते मार्कंडी दरम्यानच्या भागात पाणी होते. शीवनदी येथील झोपडपट्टी, रंगोबा साबळे रोड या मार्गावरही पुराचे पाणी आले आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारपूल पहाटे पाण्याखाली गेला होता. मात्र, सकाळी पाऊस थांबल्यामुळे झपाट्याने पाणी खाली उतरले. दिवसभर अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या.
खेर्डी परिसरात गटारे व नाले तुंबल्याने शिगवणवाडी येथे पाणी रस्त्यावर आले आहे. चिपळुणात १६६.२२ मिलिमीटर, तर १ जूनपासून आज सोमवारपर्यंत १७००.७४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. नगर परिषदेतर्फे नागरिकांना सावध राहण्यासाठी सकाळी ३ भोंगे वाजविण्यात आले. महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडईबाहेरही पाणी साचले होते. बाजारपेठेतील भेंडीनाका, मच्छीमार्केट परिसरात पाणी असल्याने सकाळच्या सत्रातील गुहागर मार्गावर जाणाऱ्या एस. टी.च्या गाड्या गुहागर बायपासमार्गे वळविण्यात आल्या होत्या.
पावसामुळे धामणवणे येथील संतोष धोंडू पिटले यांच्या घराचे ३० हजार २० रुपयांचे नुकसान झाले. खेर्डीच्या मंडल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आकले येथे सुभाष गणपत निकम यांच्या घराचे, तर कादवड येथे संतोष शांताराम शिंदे यांच्या घराचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त कोठेही मोठे नुकसान झाल्याची नोंद नाही. भातशेतीत पाणी शिरल्यामुळे शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. काढलेली भाताची रोपे वाहून गेली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्क झाली आहे. तहसीलदार जीवन देसाई व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शहरात ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बाजारपुलाजवळ बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)