चिमुकल्यांनी अनुभवली माणुसकीची ऊब

By Admin | Updated: December 2, 2014 00:46 IST2014-12-02T00:37:04+5:302014-12-02T00:46:34+5:30

उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : थंडीत कुडकुडणाऱ्या जिवांना कपडे वाटप सुरू --लोकमतइनिशिएटिव्ह

Chinchulya experienced humanity boredom | चिमुकल्यांनी अनुभवली माणुसकीची ऊब

चिमुकल्यांनी अनुभवली माणुसकीची ऊब

कोल्हापूर/कसबा बावडा : रंगीबेरंगी शर्ट, टी-शर्ट, जॅकेट,जीन्स् पॅण्ट अशी स्वच्छ, इस्त्री केलेली तसेच नवीन कपडे मिळाल्याने ऊसतोड मजुरांच्या पालावरील चिमुकले आज, सोमवारी हरखून गेली. कोल्हापूरकरांनी कपड्यांच्या माध्यमातून दिलेल्या माणुसकीच्या ऊबेने ‘त्या’ चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद ओसांडून वाहत होता. ‘लोकमत इनिशिएटिव्ह’अंतर्गत संकलित झालेल्या कपड्यांच्या वाटप मोहिमेला प्रारंभ झाला.
शहरातील झोपडपट्टी तसेच ऊसतोड मजुरांच्या वसाहतींमधील थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून ‘लोकमत’ने मांडली. कपड्यांच्या माध्यमातून त्यांना माणुसकीची ऊब देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले. ‘अवनि’ संस्थेने या उपक्रमात सहभागी होऊन कपडे संकलनाची मोहीम राबविली. १९ दिवसांच्या मोहिमेला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहरासह विविध भागांतील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी शाळा, सामाजिक, कामगार, शैक्षणिक संस्थांनी ‘एकटी’च्या कार्यालयात कपडे जमा केले. सुमारे दोन ते अडीच हजार मुलांना देता येतील इतके कपडे संकलित झाले आहेत. संकलित झालेल्या कपड्यांच्या वाटपाला आज, दुपारी दीड वाजता राजाराम साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या वसाहतीपासून सुरुवात केली. कळकट-मळकट कपड्यात वावरणाऱ्या मुलांना रंगीबेरंगी टी-शर्ट, जॅकेट, पॅण्ट, तर मुलींना शालेय गणवेश, चुडिदार, फ्रॉक, आदी कपडे देण्यात आली. स्वच्छ, इस्त्री केलेली तसेच नवीन कपडे मिळाल्यानंतर लगेचच परिधान करून ही मुले एकमेकांना ती कौतुकाने दाखवत होते. माणुसकीच्या ऊबेने ती हरखून गेली. कपड्यांच्या नवलाईचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आनंदाच्या भरात या मुलांनी कविता, बडबडगीते म्हणून दाखविली. याठिकाणी ‘अवनि’च्या उपाध्यक्ष अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते, अतुल मुगडे, अर्चना मांगलेकर यांच्या हस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले.


नवलाईचा आनंद... थंडीत कुडकुडणाऱ्या जिवांना कपड्यांच्या माध्यमातून माणुसकीची ऊब देण्याचे आवाहन ‘लोकमत इनिशिएटिव्ह’द्वारे करण्यात आले. त्याला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. सोमवारी कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या पालावरील चिमुकल्यांपासून कपडे वाटपाला सुरुवात झाली. कपडे मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर नवलाईचा आनंद फुलला होता.

Web Title: Chinchulya experienced humanity boredom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.