मिरचीचा ठसका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST2021-01-18T04:22:10+5:302021-01-18T04:22:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : यंदा लाल मिरचीची आवक काहीशी कमी असल्याने दर तेजीत आहेत. हंगाम सुरू होण्याच्या अगाेदरच ...

The chilli crunch increased | मिरचीचा ठसका वाढला

मिरचीचा ठसका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : यंदा लाल मिरचीची आवक काहीशी कमी असल्याने दर तेजीत आहेत. हंगाम सुरू होण्याच्या अगाेदरच तेजी राहिली असून ‘ब्याडगी’ ३८० रुपये किलोवर पोहोचली आहे. गोडेतेलाचे दर गगनाला भिडले असून गेल्या दोन महिन्यात किलोमागे दुपटीने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सरकी तेल १३०, तर सोयाबीन तेल १३५ रुपये किलोपर्यंत आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण दिसत आहे.

आपल्याकडे मार्चपासून लाल मिरचीचा हंगाम सुरू होतो. या कालावधीत मिरचीची मागणी वाढत असल्याने दरही तेजीत असतो. मात्र यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’ मिरचीचा दर ३८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तिखटाची ‘गुंटूर’ मिरची दोनशे रुपये किलो झाली आहे. गोडेतेलाच्या दरात गेल्या दहा-बारा दिवसांपासून वाढ होत आहे. सरकी तेल १३०, तर सोयाबीन तेल १३५ रुपये किलो आहे. साखरेच्या दरात फारशी चढ-उतार नाही. हरभरा डाळ ६५, तूरडाळ ११०, मूग डाळ १२०, तर शाबू ६० रुपये किलो आहे.

संक्रांतीमुळे आठवड्यात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मात्र आता मागणी काहीशी कमी झाल्याने दरात घसरण झाली आहे.

कोबी, वांगी, टोमॅटो, ढबू, गवार, ओला वाटाणाच्या दरात थोडी घसरण झाली आहे.

संत्र्यापेक्षा माल्टाची आवक वाढली आहे, बाजार समितीत रोज ७०० हून अधिक चुमड्यांची आवक होत आहे. साधारणत: २५ रुपये किलो दर आहे. द्राक्षांची आवक वाढू लागली असून घाऊक बाजारात सरासरी ३० रुपये किलो दर आहे.

‘संकेश्वरी’चटका देणार

इतर मिरचीच्या तुलनेत ‘संकेश्वरी’ला मागणी अधिक असते. मात्र दर जास्त असल्याने केवळ चवीसाठीच ही मिरची घेतली जाते. साधारणत: हजार रुपये किलो दर असतो, यंदा मात्र संकेश्वरी चांगलाच चटका देणार, हे निश्चित आहे.

कांदा, बटाटा स्थिर

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा व बटाट्याच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी २५, तर बटाटा १८ रुपये किलो आहे.

फोटो ओळी :

१) कोल्हापुरात द्राक्षांची आवक वाढू लागली असून पिवळ्या धमक द्राक्षांबरोबरच काळ्या द्राक्षांनाही मागणी आहे. (फोटो-१७०१२०२१-कोल- बाजार) (छाया- नसीर अत्तार)

Web Title: The chilli crunch increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.