रंकाळा टॉवर उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या मुलांना लोखंडी गजाने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:17+5:302021-08-20T04:30:17+5:30
कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरातील उद्यानात खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांना लोखंडी गजाने मारहाण करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. या ...

रंकाळा टॉवर उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या मुलांना लोखंडी गजाने मारहाण
कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरातील उद्यानात खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांना लोखंडी गजाने मारहाण करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. या मारहाणीत जयदीप लाखनसिंग कलाणी (वय १५ रा. सीक गल्ली, विचारेमाळ) हा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रोहीत मोरस्कर आणि रणजीत मोरस्कर (रा. रंकाळा टॉवर परिसर) व इतर चार जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रंकाळा टॉवर परिसरात उद्यानात खेळण्यासाठी जयदीप कलाणी व त्याचे मित्र बुधवारी सायंकाळी गेले होते. तेथे जंपिंग झुला खेळण्याचे दर ठरवण्यावरून मुलांचा झुलाचालकाशी वाद झाला. त्यातून झुला चालकाने फोन करून आपल्या सहकाऱ्यांना बोलवून घेतले. त्यावेळी आलेल्या रोहीत मोरस्कर, रणजीत मोरस्कर व इतर चौघांनी तेथे येऊन जयदीपसह लहान मुलांना लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भयभीत झालेल्या मुलांनी रंकाळा टॉवर चौकातील ड्युटीवर असलेल्या पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी आले असता हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला जयदीप कलाणी याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमीचे वडील लाखनसिंग समशरेसिंग कलाणी (रा. विचारेमाळ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली.