सेनापती कापशी : चिकोत्रा खोरा हा तसा कागल, आजरा व भुदरगड तालुक्यांच्या सीमारेषेवर वसला असून, भौगौलिकदृष्ट्या अनेक गावे डोंगराच्या कुशीत, तर काही उंच डोंगर माथ्यावर आहेत. चिकोत्रा खोऱ्यातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिकोत्रा प्रकल्प बांधण्यात आला. यामुळे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली; पण गेल्या पंधरा वर्षांत हा प्रकल्प फक्त दोनवेळाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून तर धरणात फक्त ४० ते ६० टक्केच पाणीसाठी होत आहे. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्याला सातत्याने भीषण पाणीटंचाईला सामारे जावे लागत आहे. सध्या चिकोत्रा प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्यामुळे महिन्यातून एकदाच पाणी सोडले जाते. ते पाणी बंधारा भरण्याआधीच काही स्वत:ला प्रगतिशील समजणारे शेतकरी उपसाबंदीतच राजरोसपणे पाणी उपसा करतात. याला वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी अर्थपूर्ण व्यवहार करून पाठीशी घालतात ही वस्तुस्थिती आहे. पाठबंधारे विभाग, वीज वितरण कंपनी व काही प्रगतिशील शेतकरी हे संगणमताने दोन ते तीन दिवसांत चिकोत्रा नदीचे पात्र कोरडे करतात. परिणामी, चिकोत्रा खोऱ्यातील २५ ते ३० गावांतील सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यास शेतातील विहिरींचा सहारा घ्यावा लागत आहे. पाठबंधारे व वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दिलीप तिप्पे, युवासेनेचे सागर मोहिते, यांनी वेळोवेळी आंदोलने करून अधिकाऱ्यांना निवेदन दिले;पण संबंधित विभागाकडून पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. काही शेतकऱ्यांनी तर चिकोत्रा नदीत अनधिकृत मातीचा मोठा बांध घालून संपूर्ण पाणीच अडविले व शेतीसाठी उपसा करण्यास सुरू केले. यावरही कोणतीच कारवाई झाली नाही. आता काही शेतकरी सिंगल फेज मोटारींचा राजरोस वापर करून पाणी उपसा करीत आहेत. यामुळे चिकोत्रा खोऱ्यात पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची अवस्था मोठी बिकट झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना उन्हाची पर्वा न करता शेतातील विहिरींचा आसरा घ्यावा लागत आहे. सेनापती कापशी, मुगळी, जैन्याळ, अर्जुनवाडा, नंद्याळ, बोळावी, बोळावीवाडी, तमनाकवाडा, माध्याळ, हणबरवाडी, हसूर खुर्द, कासारी, आदी गावांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.
चिकोत्रा खोऱ्याचा घसा कोरडाच...
By admin | Updated: April 7, 2017 00:28 IST