चिकोत्रा खोऱ्यात सोयीच्या आघाड्या
By Admin | Updated: July 19, 2015 23:42 IST2015-07-19T23:41:06+5:302015-07-19T23:42:34+5:30
अकरा ग्रामपंचायती : कासारीत मंडलिक-मुश्रीफ युती, अनेक ठिकाणी अपक्ष रिंगणात

चिकोत्रा खोऱ्यात सोयीच्या आघाड्या
सेनापती कापशी : राजकीयदृष्ट्या लक्षवेधी व संवेदनशील असणाऱ्या चिकोत्रा खोऱ्यातील अकरा ग्रामपंचायतींकरिता येत्या २५ तारखेला मतदान होत आहे. तालुका व जिल्हा पातळीवरील प्रमुख नेत्यांनी केलेल्या राजकीय तडजोडी पाहता स्थानिक पातळीवरही सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. गावची ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सर्वांनी आक्रमक प्रसारास सुरुवात केल्यामुळे कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे.
वडगाव येथे ९ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. संजय घाटगे-मंडलिक-राजे यांनी आघाडी केली असून, मुश्रीफ गटाने आठ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. चार उमेदवार अपक्ष आहेत. प्रमोद बाबूराव सुतार हे बिनविरोध निवडून आले आहेत. याठिकाणी नेताजी मोरे, एकनाथ नार्वेकर, रवी देवठाणेकर, रतन कांबळे, विठू दिवटणकर यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
माद्याळ येथे लक्षवेधी निवडणूक होत आहे. संजय घाटगे-मंडलिक-मुंबईकर ग्रुप विरुद्ध मुश्रीफ-राजे गटात याठिकाणी लढत होत आहे. अकरा जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. तीन उमेदवार अपक्ष आहेत. सरपंच सूर्याजीराव घोरपडे, माजी जि. प.चे उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे, अमरसिंह घोरपडे (संचालक शाहू साखर), मारुतीराव चोथे व ढोणुसे ग्रुप आपापल्या गटाचे नेतृत्व करत आहेत.
कासारीमध्ये मंडलिक-मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे गट यांच्यात लढत होत असून राजे गटाने चार जागावर आपले उमेदवार उभे केले आहेत. ९ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी राजू राजिगरे, एम. एस. पाटील, मधुकर नाईक, तानाजी पाटील, भरत पाटील, राजू कांबळे, सचिन सुतार, धनाजी काटे, शिवाजी इंगवले, दयानंद पाटील, अशोक कुरणे, आदी स्थानिक नेते आपल्या गटाची धुरा सांभाळत आहेत.
हसूर खुर्द येथे मंडलिक गटात फूट पडली असून पुंडलिक पाटील यांनी मुश्रीफ-राजे गटाबरोबर, तर एकनाथ पाटील यांनी संजय घाटगे गटाबरोबर युती केली आहे. ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे याठिकाणी सरळ लढत होत आहे. माजी सरपंच अंकुश पाटील, डी. व्ही. पाटील, सुभाष गडकरी, एकनाथ पाटील आपापल्या गटाचे नेतृत्व करीत आहेत.
मांगनूरमध्ये ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात असून मुश्रीफ-राजे-शिवसेना विरुद्ध संजय घाटगे-मंडलिक अशी युती अस्तित्वात आली आहे. भावेश्वरी परिवर्तन आघाडीचे नेतृत्व धनाजी तोरस्कर, महादेव फराकटे, रणजित पाटील, संजय जाधव आदी करत आहेत, तर विरोधी आघाडीचे नेतृत्व शामराव पाटील, आप्पासाहेब तांबेकर, बाबूराव भांदिगरे करत आहेत.
आलाबादमध्ये संजय घाटगे-मंडलिक विरुद्ध मुश्रीफ गट अशी सरळ लढत आहे. ९ जागांसाठी १८ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. माजी सरपंच जे. डी. मुसळे, संतोष खराडे, एकनाथ कामते, महंमदपाशा देसाई, आदी प्रचारात सक्रिय आहेत.
तमनाकवाडा सरपंचपद खुले असल्यामुळे लढत चुरशीने होेत आहे. मुश्रीफ-शिवसेना-रणजित पाटील विरुद्ध राजे-मंडलिक-संजय घाटगे-शिवसेना अशी युती अस्तित्वात आहे. दगडू चौगले, जयवंत तिखे, भिकाजी निवळे, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय चौगले आदी प्रचाराची धुरा सांभाळत
आहेत. (वार्ताहर)
मासा बेलेवाडीचा आदर्श
मासा बेलेवाडी गावाने ग्रामपंचायत बिनविरोध करून पायी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे, तर बेनिक्रेत ९ जागांसाठी ४९ उमेदवारांनी अर्ज भरले, पण अर्ज माघारीदिवशी नाट्यपूर्ण घडामोडी होऊन ४० जणांनी अर्ज माघार घेतल्यामुळे येथील निवडणूकही बिनविरोध झाली. एकूणच गावागावांतील राजकीय वातावरण तापू लागले असून मतदाराला थेट घरात जाऊन भेटण्यावर भर दिला जात आहे.