‘जुनी पेन्शन’साठी कर्मचारी देणार मुख्यमंत्र्यांना साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:27+5:302021-07-05T04:15:27+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आणि मयत कर्मचाऱ्यांच्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास फॅमिली पेन्शन मिळावी, ...

‘जुनी पेन्शन’साठी कर्मचारी देणार मुख्यमंत्र्यांना साद
कोल्हापूर : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आणि मयत कर्मचाऱ्यांच्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास फॅमिली पेन्शन मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा सातत्याने लढा सुरू आहे. याअंतर्गत संघटनेच्यावतीने आज, सोमवारी ‘ट्विटर’, तर उद्या, मंगळवारी ‘ई-मेल’ आंदोलन करून मागण्यांच्या पूर्ततेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाला लाखो तरुण कर्मचारी साद देणार असल्याची माहिती या संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी रविवारी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने संघटनेने ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी सर्व कर्मचारी हे ‘ट्विटर’ आंदोलन करतील. त्यामध्ये (#उद्धवजी_जुनी_पेन्शन_लागू_करा आणि #Justice4MH_Dead_NPSEployees) या हॅशटॅगचा वापर करण्यात येणार आहे. मंगळवारी ‘ई-मेल’ आंदोलन करण्यात येईल. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्व मंत्र्यांच्या ई-मेलवर आमच्या मागण्यांचे निवेदन सर्व कर्मचारी पाठविणार आहेत. संघटनेचे शिष्टमंडळात मंत्रालयात जावून मागण्यांच्या पूर्ततेबाबत मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना भेटणार आहे. आंदोलन आणि पाठपुराव्याची दखल घेवून राज्य शासन आमच्या मागण्यांची पूर्तता करेल, अशा विश्वास राज्याध्यक्ष खांडेकर यांनी व्यक्त केला आहे.