पॅकेज देणारा नव्हे, मदत करणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : फडणवीस यांनाही दिले चर्चेचे निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:08+5:302021-07-31T04:24:08+5:30
कोल्हापूर : मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार ...

पॅकेज देणारा नव्हे, मदत करणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : फडणवीस यांनाही दिले चर्चेचे निमंत्रण
कोल्हापूर : मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोल्हापूर-सांगलीतील अनेक लोकांच्या घरातील पुराचे पाणी अजून ओसरलेले नाही, लोक आता कुठे सावरत आहेत. त्यामुळे नुकसानाचा नेमका अंदाज आलेला नसल्याने मदतीची घोषणा केलेली नाही. तसेच तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिरोळ व कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन त्यांनी पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी प्रत्येकाला त्यांनी धीर दिला. सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. त्यानंतर शासकीय विश्रामधामवर बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित होते. राज्यातील सरकारमध्ये आता तीन पक्ष माझ्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीसही सोबत आले तर महापूर नियंत्रणाचे एकत्रित नियोजन करता येईल. त्यामुळे मुंबईत भेटीचे त्यांना निमंत्रण दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, महापुरानंतर नुकसानाबद्दल मदत व उपाययोजनांसाठी नक्की किती निधी लागेल, यासंबंधीचा अंदाज आम्ही घेत आहोत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे अजूनही कोणत्याही मदतीची अथवा रकमेची मागणी केलेली नाही. मी ती लगेच करणारही नाही. गुजरातला एवढे दिले म्हणून आम्हाला इतके हजार कोटी द्या, अशी माझी भूमिका नाही. जेव्हा लागेल तेव्हाच मदत मागू. त्यावेळी मात्र केंद्र सरकारने ती मदत तातडीने द्यावी कारण २०१९च्या महापुरावेळचा अनुभव तसा नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महापुरातील नुकसानाची भरपाई दिली जाते. परंतु, हा कायदा २०१५चा आहे. त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. त्यामुळे नुकसानाचे निकष बदलण्याची मागणी नीती आयोगाकडे केली आहे.
विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्या
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. त्यात दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. विमा कंपन्यांनी महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून तातडीने ५० टक्के रक्कम द्यावी व व्यापाऱ्यांना या संकटात उभे राहण्यासाठी कमी व्याज दराने बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे.