छत्रपती शिवराय मुस्लीमविरोधक नव्हते
By Admin | Updated: April 7, 2015 01:29 IST2015-04-06T21:53:39+5:302015-04-07T01:29:33+5:30
जागृती अभियान : खरा इतिहास शिकविण्यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

छत्रपती शिवराय मुस्लीमविरोधक नव्हते
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधक नव्हते. हा खरा इतिहास शालेय पाठ्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे, मौलाना आझाद फाउंडेशनचे कार्यालय साताऱ्यात सुरू व्हावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी मुस्लीम जागृती अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (दि. ६) मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लीम समाजातील अनेक कुटुंबे आज काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या समाजात कुपोषित मुलांचे प्रमाणही दिवसेंंदिवस वाढत चालले आहे. इतर बहुसंख्य जातींप्रमाणेच मुस्लीम समाजाची लोकसंख्या मोठी आहे. मात्र दोन टक्के नागरिक सोडले असता इतर सर्वांची शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती मागासलेली आहे. एवढ्या मोठ्या समाजाला अंधारात ठेवणे हे भारतीय संविधानाचे उल्लंघन ठरेल. म्हणून मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबरोबरच वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील अतिक्रमणे काढावीत, वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटवावे, जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभता येण्याच्या दृष्टिने पावले उचलावीत अशा मागण्या निवेदनात केल्या आहे.नगरपालिके समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर मोर्चा राजवाड व पोवई नाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात मुज्जफर सय्यद, तौसिफ शेख, आरिफ शेख, मिलिंद पवार, मिनजा सय्यद, शोएब शेख यांसह सादीक शेख, रफीक शेख, इतमेखाब बागवान, आमद कागदी, मौलाना कमरुद्दीन, डॉ. मोमीन, अस्लम बागवान, पार्थ पोळके, शकूर काझी आदी सहभागी झाले होते. मोर्चात मुक्तीवादी, परिवर्तनवादी संघटना, माक्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
प्रमुख मागण्या
मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे
खाटिक समाजाला स्वयंरोजगारसाठी मदत करावी
मुस्लीम समाजाला मूलभूत सुविधा देण्यात याव्या
विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय करावी
अल्पसंख्याक योजना मुस्लीम समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्रव्यवस्था तयार करावी
मुस्लीम मोहल्ल्यात समाजमंदिर बांधण्यात यावे