छत्रपती शासन महिला संघटनेने अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:09+5:302021-07-21T04:18:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील बंधन बॅँकेने महिला बचत गटाचे जुने कर्ज वसुलीसाठी नव्याने कर्ज खाते टाकत असल्याचा ...

छत्रपती शासन महिला संघटनेने अधिकाऱ्यांना धरले धारेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील बंधन बॅँकेने महिला बचत गटाचे जुने कर्ज वसुलीसाठी नव्याने कर्ज खाते टाकत असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे या नव्या कर्जाची संबंधित महिलांना माहिती न देता शासनाकडून पैसे आल्याचे सांगून नव्या कर्ज अर्जावर सह्या घेत होते. याप्रकरणी छत्रपती शासन महिला संघटनेने हस्तक्षेप करत बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
रेंदाळ (ता.हातकणंगले) येथील बचत गटाचे शहरातील बंधन बॅँकेत कर्ज खाते आहे. बॅँक कर्मचाऱ्यांनी बचत गटातील महिलांना तुमच्या खात्यावर शासनाकडून पैसे आल्याचे सांगत कर्ज माफ केले आहे, यासाठी अर्जावर सह्या पाहिजे, असे सांगून बोलावून घेतले. महिलांना नेमकी माहिती न समजल्याने त्यांनी सह्या करण्यास नकार देत महिला संघटनेला कळवले. संघटनेच्या प्रतिनिधींनी बॅँकेत येऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरले. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. बॅँक अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.