चष्मेबद्दूर! --नेते ‘दूर’दृष्टीचे ---जवळचाच जरा ‘प्रॉब्लेम’

By Admin | Updated: November 23, 2015 00:29 IST2015-11-22T23:15:27+5:302015-11-23T00:29:38+5:30

--किसी की नजर ना लगे...

Chess! - The 'far-sighted' vision of the 'little problem' | चष्मेबद्दूर! --नेते ‘दूर’दृष्टीचे ---जवळचाच जरा ‘प्रॉब्लेम’

चष्मेबद्दूर! --नेते ‘दूर’दृष्टीचे ---जवळचाच जरा ‘प्रॉब्लेम’

सातारा : स्वभाव, गुणवैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती कितीही वेगवेगळी असो, नेतेमंडळींमध्ये एका बाबतीत कमालीचे साधर्म्य असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी आढळून आले. अपवाद वगळता सर्वच नेत्यांना केवळ वाचताना चष्मा लावावा लागतो. ज्यांना पूर्वी तो लागत नसे, त्यांच्याही डोळ्यावर हा ‘दागिना’ हल्लीच चढलेला दिसतो आहे.
जवळचे-दूरचे काहीही पाहायचे असो, कायमस्वरूपी चष्मा वापरावा लागणारे नेते जिल्ह्यात अगदीच मोजके आहेत. यात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पाटणच्या भौगोलिक रचनेप्रमाणेच तेथील राजकारणातदेखील कायम उंचसखलपणा आढळतो. त्यामुळे नेत्यांना जवळच्या आणि दूरच्याही घडामोडींवर कायम लक्ष ठेवावे लागते. माढ्याचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार विजयसिंंह मोहिते-पाटील यांचा चष्माही ‘कायमस्वरूपी’ आहे. सातारा जिल्ह्यात समाविष्ट असलेला माढ्यातला दूरचा भाग आणि जवळच्या प्रदेशात सतत तयार होणारे विरोधकांचे नवे-नवे गट या दोहोंवर त्यांना यामुळे चांगली नजर ठेवता येत असावी.इतर बहुतांश नेत्यांचे जुने किंवा नव्यानं चढलेले चष्मे ‘बायोफोकल’ आहेत. नव्याने चष्मा लागलेल्या नेत्यांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे. बेधडक उदयनराजेंनी जवळच्या किंंवा दूरच्याही विरोधकांची कधी तमा बाळगली नाही. त्यांच्या भेदक नजरेसमोर विरोधकही टिकलेले नाहीत. पण कधी ‘नाकाखाली’च कुरघोड्या सुरू झाल्या, तर असू द्यावा म्हणून ते हल्ली अर्ध्या नाकावर चष्मा घेऊन कागदपत्रे चाळू लागल्याचे दिसते. ते ‘ट्रेन्डसेटर’ असल्यामुळे अर्ध्या नाकावर चष्मा घेण्याची त्यांची स्टाइलसुद्धा ‘कॉपी’ होण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत असावी.
पालकमंत्री विजय शिवतारे यांचा चष्माही ‘जवळचा’च आहे. पुरंदर तालुक्यातून साताऱ्याचं पालकत्व निभावताना त्यांनाही फारशा अडचणी येत नसाव्यात; मात्र त्यांचे ‘अल्टिमेट टार्गेट’ असलेले बारामती ‘जवळचे’ असल्यामुळेच कदाचित त्यांचा चष्माही ‘जवळचा’ आहे. शशिकांत शिंदे यांना तर मुळात ‘जवळचे’ सोडून दूर जाऊन पाय रोवावे लागले. जावळी मतदारसंघ गेला आणि त्यांनी कोरेगावात हिकमतीने बस्तान बसवले. दोन्ही ठिकाणी त्यांची पकड मजबूत असली तरी अधूनमधून ‘जवळच्या’ मैदानावरच विरोधक उचल खातात, हे जावळीत ग्रामपंचायत निवडणुकीपासून कुठे-कुठे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे ‘जवळच्या’ चष्म्याची त्यांनाही नितांत गरज वाटत असणार.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही जवळच्या गोष्टी पाहण्यासाठीच चष्मा वापरावा लागतो. इतर अनेक मतदारसंघांप्रमाणेच साताऱ्यातही ‘जवळच्यां’वर अधिक बारीक नजर ठेवावी लागते, हे प्रदीर्घ अभ्यासांती शिवेंद्रराजेंना चांगलेच माहीत आहे.आनंदराव पाटील यांनाही नेहमी ‘जवळचे’च बघावे लागते. एक तर कऱ्हाडात कोण, कधी, कोणासोबत जाईल, याचा अंदाज येणे खूप अवघड. पक्षांपेक्षा गटांचे राजकारण मोठे. त्यामुळे फार दूरचा विचार करण्यापेक्षा गटावर लक्ष केंद्रित करणे कऱ्हाडमध्ये महत्त्वाचे ठरते. मर्यादित राजकीय परिघातील घडामोडी स्पष्ट दिसाव्यात म्हणून त्यांचा चष्माही ‘जवळचा’च! (प्रतिनिधी)

किसी की नजर ना लगे...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिलेले नेते चष्मा लावून कागदपत्रे चाळताना दिसतात. एरवी अभावानेच चष्म्यात दिसणारे पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर.

बाबा, आबा, जयकुमार ‘नशीबवान’
जिल्ह्यातील नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील आणि आमदार जयकुमार गोरे हे तिघे चष्म्याच्या बाबतीत इतरांपेक्षा भाग्यवान आहेत. यांना ना जवळचे पाहायला चष्मा लागतो, ना दूरचे पाहायला. खरे तर ‘जवळचे’ धोके या तिघांच्या मतदारसंघात नेहमीच उभे असतात. परंतु तरीही बिगरचष्मा सर्वकाही हेरण्यातला त्यांचा ‘कॉन्फिडन्स’ वाखाणण्याजोगाच!


यांना दूरचेच पाहावे लागते
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी मात्र कायम चष्मा वापरणारे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनाही कायम दूरचेच पाहावे लागते, त्यामुळे त्यांचाही चष्मा ‘पर्मनंट’च आहे. ‘सीईओ’ नितीन पाटील नेहमी चष्मा वापरत असले तरी तो डोक्यावर ठेवून बोलण्याची त्यांची खासीयत लक्षवेधी!

Web Title: Chess! - The 'far-sighted' vision of the 'little problem'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.