केमिकल झोन कोकणात नाहीच
By Admin | Updated: October 2, 2015 23:19 IST2015-10-02T23:19:00+5:302015-10-02T23:19:16+5:30
विनायक राऊत : मुख्यमंत्री ओघात बोलले

केमिकल झोन कोकणात नाहीच
सावंतवाडी : कोकणात केमिकल झोन होणार नाही. नागपूरमध्ये उद्योजकांच्या बैठकीत भाषणाच्या ओघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले असून, त्यांनी याबाबतचा आमच्याकडे खुलासा केला आहे. त्यामुळे केमिकल झोनचा विषय संपला आहे, असे मत खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मांडले.
ते शुक्रवारी सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकार वेळागर येथे होणाऱ्या पंचतारांकित हॉटेलबाबत ताज समूहाशी आठ दिवसांत करार करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख शब्बीर मणियार आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानभरपाई देत असताना एका सात-बारावर मोठ्या प्रमाणात नावे असल्याने कोणाला नुकसानभरपाई द्यावी, असा प्रश्न येतो. पण आता हा प्रश्न निकाली निघाला असून, पूर्वीप्रमाणे हमीपत्राद्वारे ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत गुरुवारी मंत्रालयात पालकमंत्री दीपक केसरकर तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व आपल्या उपस्थितीत बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सीआरझेडबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘पंचतारांकित’चा करार आठवड्यात
शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी ताज गु्रपने बरीच वर्षे झाली जागा घेतली. याचे भाडे नाममात्र दराने सरकारकडे भरले जाते. पण अद्यापपर्यंत या ठिकाणी हॉटेल उभारणी करण्यात आली नाही. ही बाब बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या आठ दिवसांत या प्रकल्पाबाबत ताज गु्रपशी चर्चा करून करार करण्यात येणार आहे.
त्यामुळे बरीच वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न निकाली लागणार आहेत. मुख्यमंत्री सिंधुदुर्गमधील पर्यटनवाढीसाठी उत्सुक असून, आणखी काही खासगी गुंतवणूक कोकणात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.