अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया २६ जुलैपासून; समितीच्या बैठकीत निर्णय

By Admin | Updated: July 3, 2015 01:07 IST2015-07-03T01:07:49+5:302015-07-03T01:07:49+5:30

असा असेल कालावधी

The chemical processing of Ambabai idol from 26th July; Decision in the meeting of the committee | अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया २६ जुलैपासून; समितीच्या बैठकीत निर्णय

अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया २६ जुलैपासून; समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारा १ लाख ३५ हजारांचा धनादेश केंद्रीय पुरातत्त्व खात्याला पाठविण्याचा निर्णय गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत
घेण्यात आला. आज, शुक्रवारी हा धनादेश देण्यात येणार आहे. यामुळे मूर्ती संवर्धनाचा मार्ग सुकर झाला असून, २६ जुलैपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेचा (केमिकल कॉन्झर्व्हेशन) पहिला टप्पा म्हणून ११ जूनला केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून हा अहवाल मंजुरीसाठी पाठविला होता. त्या अहवालाला केंद्रीय पुरातत्त्व खात्याने अंतिम मंजुरी देत प्रक्रियेसाठी येणारा १ लाख ३५ हजारांचा खर्च देवस्थानने धनादेशाद्वारे
पाठवावा, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले होते. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी, यावर दोन आठवड्यांत समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. (पान ९ वर)

असा असेल कालावधी
सध्या आषाढ महिना आणि पावसाळा सुरू असल्याने या कालावधीतच मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
पुरातत्त्व खाते व श्रीपूजकांशी चर्चा करून २६ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीतील तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या प्रक्रियेसाठी सहा आणि जास्तीत जास्त १० दिवसांचा कालावधी लागणार असून, ती सीसीटीव्हीच्या निगराणीखाली केली जाईल. या कालावधीत मंदिरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार आहे.

मंदिर खुलेच राहणार
मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू असली तरी या काळात मंदिर बंद ठेवले जाणार नाही; कारण मूर्तीवर रात्री केमिकल कॉन्झर्व्हेशन केले जाईल व दिवसभर ती दर्शनासाठी खुली ठेवली जाईल. मूर्तीवर केले जाणारे अभिषेक, अन्य धार्मिक विधी हे उत्सवमूर्तीवर केले जातील.

अंबाबाई मूर्ती संवर्धनाची सुरुवात म्हणून देवस्थानकडून पुरातत्त्व खात्याला निधी पाठविण्यात येत आहे. देवस्थानची जबाबदारी इथपर्यंत होती. यापुढे पुरातत्त्व खाते ठरवील त्याप्रमाणे कार्यवाही होईल. या सगळ्या प्रक्रियेला देवस्थानचे सहकार्य असेल.
- डॉ. अमित सैनी, अध्यक्ष, देवस्थान समिती

Web Title: The chemical processing of Ambabai idol from 26th July; Decision in the meeting of the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.