रासायनिक संवर्धन प्रक्रिया आजपासून

By Admin | Updated: July 25, 2015 01:15 IST2015-07-25T01:14:36+5:302015-07-25T01:15:36+5:30

अंबाबाई मूर्ती : जिल्हाधिकारी सैनी यांची माहिती; दोन दिवसांच्या तणावानंतर वाद मिटला

The chemical enrichment process today | रासायनिक संवर्धन प्रक्रिया आजपासून

रासायनिक संवर्धन प्रक्रिया आजपासून

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला झालेल्या विरोधामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात निर्माण झालेला तणाव शुक्रवारी निवळला. प्रक्रियेसंबंधीचा वाद आता मिटला असून, आज, शनिवारपासून रासायनिक संवर्धन प्रक्रियेचा शुभारंभ होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेअंतर्गत २२ तारखेला धार्मिक विधी सुरू झाले. मात्र त्याच दिवशी हिंदू जनजागृती समितीने केलेल्या विरोधामुळे आम्ही कोल्हापुरात येणार नाही, अशी माहिती पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी श्रीपूजकांना दिली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रासायनिक संवर्धनाला झालेल्या विरोधाबद्दल नागरिकांतून अत्यंत तीव्र भावना व्यक्त होत होत्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी देवस्थान समिती, करवीरनिवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ, हिंदू जनजागृती समिती यांची संयुक्त बैठक बोलावली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णय जाहीर केले. ते म्हणाले, दोन दिवस उशीर झाला असला तरी ठरल्याप्रमाणे आज, शनिवारी सकाळपासूनच अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होईल. प्रक्रियेसाठीचा निधी औरंगाबादला वर्ग झाला असून, तेथून ‘पुरातत्त्व’चे अधिकारी व तज्ज्ञांचे पथक कोल्हापूरसाठी रवाना झाले आहे. ते रात्री उशिरा कोल्हापुरात येतील. बैठकीस श्रीपूजक अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर, माधव मुनीश्वर, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, बी. एन. पाटील-मुंगळीकर, प्रमोद पाटील, व्यवस्थापक धनाजी जाधव, सहसचिव एस. एस. साळवी, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, वीरेंद्र इचलकरंजीकर, मधुकर नाझरे, प्रमोद सावंत, आदी उपस्थित होते.

जबाबदारी ‘पुरातत्त्व’चीच...
जिल्हाधिकारी म्हणाले, ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया करीत असताना मूर्तीचे काही नुकसान झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पुरातत्त्व खात्याचीच असेल. रासायनिक प्रक्रिया करण्यापूर्वीचे मूर्तीचे छायाचित्र व त्याचे चित्रीकरण, प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरची छायाचित्रे व त्याचे चित्रीकरण, याशिवाय रासायनिक संवर्धन कशा पद्धतीने केले, त्याची सर्व माहिती पुरातत्त्व खात्याने नोंदीच्या स्वरूपात द्यावी, अशा सूचना ‘पुरातत्त्व’च्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

नव्या मूर्तीबाबत
६ आॅगस्टनंतर विचार
हिंदू जनजागृती समितीने मागणी केल्याप्रमाणे अंबाबाईची मूर्ती बदलण्याबाबत ६ आॅगस्टनंतर विचार केला जाईल. त्यासाठी समितीने देवस्थान समितीला मूर्ती बदलण्यासाठीचे विनंतीपत्र पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यावर श्रीपूजक आणि देवस्थान समितीच्या संयुक्त बैठकीत विचारविनिमय केला जाईल.

 

Web Title: The chemical enrichment process today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.