अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया होणारच
By Admin | Updated: July 24, 2015 00:53 IST2015-07-24T00:53:03+5:302015-07-24T00:53:16+5:30
मार्ग मोकळा : औरंगाबादचे पथक आज कोल्हापुरात

अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया होणारच
कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला हिंदू जनजागृती समितीने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी पुरातत्त्व खात्याचे महासंचालक राकेश तिवारी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी तिवारी यांनी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानुसार औरंगाबादचे पुरातत्व विभागाचे पथक आजच शुक्रवारी कोल्हापुरात दाखल होत आहे. त्यामुळे रासायनिक संवर्धनचा मार्ग मोकळा झाला आहे. मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पुरातत्व खात्याला पाठविले होते. यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आले नव्हते. दरम्यान मूर्तीवरील धार्मिक विधी सुरू केलेले असल्याने ते सुरुच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतला होता.श्रीपूजकांनी कालच खासदार महाडिक यांना रासायनिक प्रक्रियेसंबंधी आवश्यक ती कागदपत्रे मेलद्वारे पाठवून ही प्रक्रिया नियोजित वेळेत सुरू होण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार खासदार महाडिक यांनी ‘पुरातत्त्व’चे अधिकारी डॉ. तिवारी यांची भेट घेतली. तिवारी यांनी संवर्धन विभागाचे संचालक जन्वील शर्मा आणि विज्ञान विभागाचे संचालक सक्सेना यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
रासायनिक संवर्धन प्रक्रियेसाठी देवस्थान समितीने पुरातत्त्व खात्याच्या दिल्ली येथील कार्यालयाकडे निधी जमा केला आहे. तो निधी औरंगाबाद विभागाकडे वर्ग करण्याची गरज होती परंतू तो केलाच नाही. आजच शुक्रवारी हा निधी वर्ग केला जाईल. संचालक शर्मा औरंगाबादचे पुरातत्त्व खात्याचे अधिकारी एम.के.सिंग यांना काम सुरू करण्याचे आदेश देतील, असेही चर्चेत ठरले. खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनाही या चर्चेची माहिती दिली. या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर रासायनिक प्रक्रियेला सुरुवात होईल, त्यात कोणताही अडचण नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयाकडे न्यायालयीन आदेशाची पूर्तता व्हावी यासाठी दरखास्त केली आहे.
मी गुरुवारी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या संचालकांची भेट घेतली. रासायनिक प्रक्रिया करण्याची रक्कम केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पाठविण्यात आली आहे. ही रक्कम औरंगाबाद विभागाला वर्ग होऊन रासायनिक प्रक्रियेला दोन-तीन दिवसांत सुरुवात होईल. त्यात कोणतीही अडचण नाही.
- धनंजय महाडिक, खासदार
आम्हाला रासायनिक संवर्धनासाठी कोल्हापुरात जाण्याचा आदेश अद्याप आला नसला तरी ही तांत्रिक प्रक्रिया शुक्रवारपर्यंत पूर्ण होईल आणि तातडीने आम्हा सातजणांचे पथक कोल्हापूरला रवाना होईल. चिंता करण्याचे कारण नाही. - एम. के. सिंग,
औरंगाबादचे पुरातत्त्व खात्याचे अधिकारी