रस्ते विकास प्रकल्पाची तपासणी सुरू
By Admin | Updated: July 16, 2014 01:01 IST2014-07-16T00:53:03+5:302014-07-16T01:01:52+5:30
‘एमएसआरडीसी’चे पथक कोल्हापुरात : महिनाअखेरपर्यंत होणार काम पूर्ण

रस्ते विकास प्रकल्पाची तपासणी सुरू
संतोष पाटील - कोल्हापूर
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात आयआरबीने केलेल्या ४९.९९ किलोमीटर रस्त्याच्या तपासणीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. मंडळाच्या चार अभियंत्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले असून, ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण) द्वारे संपूर्ण प्रकल्पाची ‘कुंडली’ तयार केली जाणार आहे. पदपथ, रस्त्याची उंची (प्लिंथ लेव्हल), डांबरी व सिमेंटच्या रस्त्याची समानता, दोन्ही बाजूंची रूंदी, दर्जा, आदी तपासणी पुढील पंधरा दिवसांत केली जाणार आहे. आयआरबीने प्रकल्पाची अंदाजित किंमत ५०० कोटी रुपये असल्याचा दावा कंपनीने केल्यानेच राज्य शासनाने तपासणीचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
मंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याचा दर्जा तपासण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली आहे. समितीने पंधरा दिवसांपूर्वीच शहराला भेट देऊन आढावा घेतला. समितीचे काम सुरू होण्यापूर्वीच मंडळाने स्वतंत्ररित्या रस्त्यांची तपासणी सुरू केली आहे. मंडळाने चार अभियंत्यासह चार पथके तैनात केली आहेत. शहराच्या विविध भागात फिरून प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली जात आहे.
डांबरी व सिमेंट अशा पद्धतीने रस्ते केल्याने दोन्हींच्या मध्ये समानता नाही. यामुळे दुचाकीसह मोठ्या वाहनांचीही अडचण होते. शास्त्रीय पद्धतीने दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची तपासणी केली जाणार आहे. रस्त्याची उंची वाढविण्याची आवश्यकता होती का ? याची चाचपणी करून सिमेंटची तपासणी केली जाणार आहे. पथक दोन्ही बाजूंचे फुटपाथ व त्यांची पाणी जाण्याची क्षमता व दर्जा याचीही तपासणी करणार आहे. रस्त्याकडेच्या सर्व इमारतींची उंची तपासून रस्त्याच्या उंचीमुळे येणाऱ्या अडचणी अहवालात नमूद केल्या जाणार आहेत. जुलैअखेरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होणार असून, याचा सविस्तर अहवाल मंडळाला सादर केला जाणार आहे. अहवालाचे पुढे काय होणार, याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही.