६० हजार विद्यार्थ्यांची कल तपासणी
By Admin | Updated: January 11, 2016 01:09 IST2016-01-11T00:53:21+5:302016-01-11T01:09:28+5:30
पुढील महिन्यात चाचणी : आॅनलाईन नोंदणी न केलेल्या २१ शाळांना नोटीस; दुकानदारीला चाप

६० हजार विद्यार्थ्यांची कल तपासणी
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -जिल्ह्यातील सर्व माध्यमांतील दहावीच्या ६० हजार ६९० विद्यार्थ्यांची कल चाचणी ५ ते १५ फेब्रुवारीअखेर घेण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभाग व कोल्हापूर विभागीय माध्यमिक, उच्च माध्यमिक मंडळ (एसएससी)च्या प्रशासनाने केले आहे. कल चाचणीसाठी आॅनलाईन नोंदणी न केलेल्या २१ शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी नोटीस दिली आहे. शाळांमध्येच मोफत कल चाचणी होणार असल्यामुळे खासगी दुकानदारीला चाप बसणार आहे.कोणत्या क्षेत्रात आवड आहे, हे तपासून अभ्यासक्रमांची निवड केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे करिअर चांगले होते. दहावीनंतर अभ्यासक्रमाची निवड केली जाते. त्यामुळे दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पालक आपल्या पाल्याची कल चाचणी करून घेतात. त्या चाचणीत कल अधिक असलेल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. अलीकडे कल चाचणी करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होते आहे. परिणामी खासगी काही संस्था आणि व्यक्ती कल चाचणी घेऊन निकाल देतात. त्यासाठी कमीत कमी दोन ते पाच हजारांपर्यंत फी घेतात.दरम्यान, शासनाच्या शिक्षण विभागाने यंदा शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत कल चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील मंडळांना आणि माध्यमिक शिक्षण विभागास सूचना दिल्या आहेत. कल चाचणीचा निकाल दहावीच्या गुणपत्रिकेबरोबरच दिला जाणार आहे. जो विद्यार्थी कल चाचणी देणार नाही, त्याची दहावीची गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून दिली जाणार नाही. त्यामुळे प्र्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यास कल चाचणी देणे बंधनकारक आहे. मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागातर्फे प्रत्येक शाळांमध्ये कल चाचणी घेण्याचे नियोजन केले आहे.
शिक्षण विभाग आणि मंडळाच्या प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील ९५३ माध्यमिक शाळांना कल चाचणीसंबंधी माहिती दिली आहे. आॅनलाईन नोंदणीसाठी आवाहन केले आहे. मंडळाकडे कल चाचणी नोंदणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१५ अखेर होती. त्यामध्ये अद्याप २१ शाळांनी नोंदणी केलेली नाही. त्या शाळांना कल चाचणीसाठी नोंदणी करा, अन्यथा शाळेचा परीक्षेचा ‘सांकेतिक क्रमांक’ गोठविण्यात येईल, अशी नोटीस दिली आहे. नोंदणीसाठी शेवटची संधी दिली आहे. नोंदणी न केल्यास संबंधित शाळांवर कारवाई होणार आहे. कारवाई झाल्यास त्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येणार नाही. इतके गंभीर असतानाही २१ शाळांनी मुदतीत नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामध्ये बहुतांशी खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत.
तालुकानिहाय कल चाचणी देणारे विद्यार्थी
दहावीचे विद्यार्थी, कंसात विद्यार्थिनींची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - १००१ (८६५), भुदरगड - १४२३ (१२३८), चंदगड - १७६४ (१५११), गडहिंग्लज - २२६३ (१९६६), गगनबावडा - ३४२ (२५०), हातकणंगले - ५७३७ (५०१७), कागल - २६५३ (२०१७), करवीर - ३७९४ (२७२७), कोल्हापूर शहर - ५०४१ (३९९०), पन्हाळा - २७६४ (१८२६), राधानगरी - १७४५ (१४९४), शाहूवाडी - १५७५ (११९०), शिरोळ - ३०७५ (२४२२).
शासनाच्या आदेशानुसार सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी शाळास्तरावर घेण्याचे नियोजन केले आहे. कल चाचणीसाठी आॅनलाईन नोंदणी न केलेल्या २१ शाळांना नोटीस दिली आहे. त्वरित नोंदणी न केल्यास कारवाई केली जाईल. पुढील महिन्यात संबंधित शाळांत कलचाचणी घेतली जाईल.
- ज्योत्स्ना शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी