फेसबुक व्हिडिओ कॉल करून तरुणींकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:44+5:302021-08-20T04:28:44+5:30
रमेश सुतार : बुबनाळ : फेसबुकवर अनोळखी तरुणींकडून मैत्रीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार वाढला आहे. मैत्री करत फेसबुक ...

फेसबुक व्हिडिओ कॉल करून तरुणींकडून फसवणूक
रमेश सुतार : बुबनाळ
: फेसबुकवर अनोळखी तरुणींकडून मैत्रीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार वाढला आहे. मैत्री करत फेसबुक मॅसेंजरव्दारे चॅटिंग करत व्हिडिओ कॉलिंग केले जाते. त्यानंतर फेसबुकच्या मित्रांना व्हिडिओ कॉलिंगचे रेकॉर्डिंग दाखविण्याची धमकी देत फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत. गुगल पेवर अनोळखी तरुणींकडून पैशाची मागणी करून ब्लॅकमेल केल्याच्या या प्रकाराबाबत बदनामी होऊ नये म्हणून कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींची मैत्री होऊन लग्न झालेले आहे. अशा अनेक घटना ताज्या असताना कोरोनाच्या काळात फसवणुकीचा नवा फंडा काही तरुणींनी आत्मसात केला आहे. रुपाली कुमारी, अरुणा वर्मा, रिया शर्मा, संगीता जाल अशा बोगस नावाने फेसबुकवर तरुणींची फ्रेंड रिक्वेस्ट सुरुवातीला येते.
रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर फेसबुकवर मॅसेज येण्यास सुरुवात होते. मी दिल्लीत राहते, मला तुम्ही आवडता, मला तुमच्याशी व्हिडिओ कॉल करावयाचा आहे, असे आमिष दाखवत तरुणींकडून व्हिडिओ कॉल केला जातो. हिंदीमध्ये अश्लील संभाषण होते. त्यानंतर फोन कट केला जातो. लगेच स्क्रीन रेकॉर्ड करून पैशाची मागणी केली जाते. मोबाईल नंबर देऊन या नंबरवर मला गुगल पेवरून पाच ते दहा हजार पैसे पाठव नाहीतर तुझ्या प्रोफाईमधील मित्रांना तुझा व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग पाठवीन, अशी धमकी दिली जाते. या प्रकरणामध्ये अनेक तरुण अडकत आहेत. अनेकांनी बदनामीच्या भीतीपोटी हजारो रुपये दिले आहेत. याबाबत तक्रार न केल्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावत आहे.
कोट - फेसबुकवर व्हिडिओ कॉलमध्ये दाखविल्या जाणाऱ्या मुलींचे व्हिडिओ कॉलिंग हा रेकॉर्ड केलेला खोटा असतो. फेसबुकव्दारे अनोळखी फसवणुकीचा मॅसेज आल्यास तत्काळ मॅसेज ब्लॉक करून पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच फेसबुकवरून मोबाईल नंबर काढून टाकावा व प्रोफाईल लॉक करून अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नये.
- संतोष डोके, पोलीस निरीक्षक विटा, पोलीस ठाणे.