दराची कोंडी फुटेना!
By Admin | Updated: November 24, 2015 00:36 IST2015-11-24T00:33:11+5:302015-11-24T00:36:48+5:30
‘एफआरपी’चे गुऱ्हाळ : शुगर लॉबीच्या दबावाने सक्षम कारखानेही गप्प

दराची कोंडी फुटेना!
राजाराम लोंढे -- कोल्हापूर -साखर हंगाम सुरू होऊन पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. आणखी पंधरा दिवसांनी ऊसदराचे आंदोलन धुमसण्यास सुरुवात होणार आहे. आंदोलन अधिक उग्र होण्यापूर्वी ज्या कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी दराची कोंडी फोडणे गरजेचे आहे. कोल्हापूर विभागात सहकार व खासगी अशा नऊ साखर कारखान्यांची कुवत आहे; पण शुगर लॉबीच्या दबावापोटी एकही कारखाना ही कोंडी फोडण्यासाठी पुढे येत नाही.
साखरेचे दर कमी असल्याने बॅँकांकडून साखर पोत्यावर उचल कमी मिळणार असल्याने एकरकमी एफआरपी द्यायची कशी? असा पेच कारखानदारांसमोर आहे. उसाचा वाढत जाणारा उत्पादन खर्च व पीक कर्ज पाहता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीही कमी पडणार आहे, अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारी साखर कारखान्यांची आहे; पण साखरेच्या पडलेल्या दराचे राजकारण करीत सर्वच कारखान्यांनी एकरकमी एफआरपीबाबत तोंडावर बोट ठेवले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांना ‘एफआरपी’चा गुंता सोडविण्यासाठी महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यामुळे आणखी आठ-दहा दिवसांनी ‘एफआरपी’ पुन्हा धुमसणार आहे.
सरकारने मदत करावी, या अपेक्षेवर कारखानदार बसले आहेत. एकट्या साखर उद्योगाला किती मदत द्यायची, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सरकारकडे बोट दाखवून कारखानदार निवांत राहिले आहेत. जास्तच तगादा लावला तर कारखान्यांचा पट्टा पाडण्याच्या मानसिकतेत कारखानदार आहेत, अशा आर्थिकदृष्टया सक्षम कारखान्यांची एफआरपीची कोंडी फोडणे गरजेचे आहे. कोल्हापूर विभागात विश्वासराव नाईक, राजारामबापू-साखराळे, शाहू-कागल, दत्त-शिरोळ, जवाहर-हुपरी, मंडलिक-हमीदवाडा यासह दालमिया-आसुर्ले, गुरुदत्त-टाकळीवाडी, सदगुरू-सांगली या कारखान्यांनी पुढाकार घेऊन ही कोंडी फोडावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे; पण साखर लॉबीपुढे हे कारखाने गप्प बसल्याचे बोलले जात आहे.
गत हंगामातील अद्याप ५६ कोटी देणे
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत २२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. हंगामाने गती घेतली असून सर्वाधिक १ लाख ९५ हजार टनाचे गाळप वारणा सहकारी कारखान्याने केले आहे. साखर उतारा अद्याप १० टक्क्यांच्या खाली आहे. हंगामाने गती घेतली असली तरी मागील ५६ कोटी एफआरपी देय आहे.
जिल्ह्यातील ‘दौलत’, ‘उदयसिंगराव गायकवाड’, ‘इंदिरा महिला’ व महाडिक शुगर्स वगळता १९ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘तासगाव’, ‘यशवंत’ हे वगळता १४ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. मागील देय व आगामी एफआरपीची कोंडी या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामाने गती घेतली आहे.
गतहंगामात कोल्हापूर विभागाची ५१२५ कोटी देय एफआरपी होती. त्यापैकी जिल्ह्यातील ५१ कोटी १२ लाख एफआरपी देय आहे. ‘वारणा’कडे २५ कोटी ‘नलवडे’कडे ८ कोटी ४८ लाख रुपये देय आहे.
शिवसेनेचा आज मोर्चा
पंधरा दिवसांत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्या, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीनेमंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
कारखानागाळप टनसाखर
उतारा
वारणा१,९५,०००१०.१४
पंचगंगा५७,५८०-
कुंभी६१,०६०१०.११
बिद्री५०,५५०१०.०६
भोगावती२८,५२०७.२८
दत्त-शिरोळ१०,१००१०.८२
गडहिंग्लज५२,६५०१०.७५
शाहू-कागल६०,९२०९.४१
जवाहर१,०३,०००९.७५
राजाराम३३,९५०८.७२
आजरा३२,६७०९.०८
मंडलिक४७,६६०१०.१४
शरद५०,०६०१०.२६
डी. वाय.१,०६०००१०.३१
दालमिया१,०६०००१०.८३
गुरूदत्त४९,५७०१३.०२
नलवडे शुगर्स२०,४४५७.८६
हेमरस५८,११०९.२०
सरकारबरोबर ‘स्वाभिमानी’ची कोंडी
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनासाठी त्यांच्यावर मर्यादा येणार आहेत. याचा फायदा उठविण्यासाठी इतर संघटना आक्रमक होऊन सरकारसह ‘स्वाभिमानी’ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात.
शेतकऱ्यांना ‘मंडलिकां’ची आठवण
ज्यावेळी ऊसदराची कोंडी व्हायची, त्यावेळी राज्यात सर्वप्रथम पहिली उचल जाहीर करून दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक हे कोंडी फोडत होते. गतवर्षीही त्यांनी एकरकमी एफआरपीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण शुगर लॉबी अंगावर आली; पण नंतर सर्वांनीच एकरकमी पैसे दिले. यावर्षी ज्यांची कुवत आहे, ते कारखानेही मूग गिळून गप्प आहेत.