क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारावे
By Admin | Updated: June 13, 2016 00:13 IST2016-06-12T23:59:53+5:302016-06-13T00:13:09+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : हातकणंगले तालुका शिक्षक संघटनेची मागणी

क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारावे
इचलकरंजी : शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी सध्या प्रतिखेळाडू आकारले जाणारे शुल्क रद्द करून ते पूर्ववत शालेय पटसंख्येनुसारच घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आले.
जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून विविध शासकीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी पूर्वी शालेय पटसंख्येनुसार शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये वैयक्तिकसाठी २५ रुपये आणि सांघिकसाठी ५० रुपये शुल्क होते. मात्र, गतवर्षीपासून क्रीडा कार्यालयाने त्यामध्ये बदल केला असून, प्रतिखेळाडू शुल्क आकारणे सुरू केले आहे. अशा प्रकारच्या आकारणीमुळे विद्यार्थी व पालकांवर आर्थिक भार पडणार आहे. त्यासाठी हे शुल्क पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावे, यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेतली.
प्रति खेळाडू आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. शिवाय शाळांना वेतनेतर अनुदान मिळत नसल्याने शाळासुद्धा खेळाडूंचे शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. पूर्वीप्रमाणे शुल्क आकारणी केल्यास स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढून शाळा आणि जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडण्यास मदत मिळू शकेल, असे या शिष्टमंडळाने चर्चेवेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. शिष्टमंडळात रावसाहेब कारंडे, शिवाजी पाटील, अलका पाटील, शंकर पोवार, राहुल कुलकर्णी, विजय गुरव, भिकाजी माने, संताजी भोसले, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)