‘गोकुळ’वरील आरोप महाडिकांकडून बेदखल

By Admin | Updated: July 4, 2016 00:49 IST2016-07-04T00:49:04+5:302016-07-04T00:49:04+5:30

गंभीर आरोपांचे काय? : विश्वास पाटील यांच्यासह संचालकांचेही तोंडावर बोट

The charges against Gokul were evicted from Mahadik | ‘गोकुळ’वरील आरोप महाडिकांकडून बेदखल

‘गोकुळ’वरील आरोप महाडिकांकडून बेदखल

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या कारभाराबाबत आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपांवर संघाचे नेते महादेवराव महाडिक यांनी भाष्य करणे टाळले आहे. याबाबत अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्यासह संचालकांनीही तोंडावर बोट ठेवले आहे. गंभीर आरोप होऊन नेत्यांसह संचालकांनीही ते बेदखल केले आहेत.
‘गोकुळ’मध्ये दूध वितरण टेंडर, टॅँकर भाडे, अ‍ॅल्युमिनियम कॅन खरेदी, कडबा कुट्टी यंत्रे, आदींमध्ये नेत्यांसह संचालकांनी कोट्यवधींचा ढपला पाडल्याचा आरोप करीत उत्पादकांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी शनिवारी सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगले यांच्याकडे केली होती.
त्याचबरोबर ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा महादेवराव महाडिक यांचा डाव हाणून पाडल्याचा गंभीर आरोपही आमदार पाटील यांनी केला होता. पाटील यांच्या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा महाडिक व सतेज पाटील यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ऐकावयास मिळणार असे वाटत होते.
एरव्ही ‘गोकुळ’च्या विरोधात एखादी जरी बातमी आली तरी तत्काळ खुलासा करणारी यंत्रणा पाटील यांच्या आरोपाला त्याच ताकदीने उत्तर देईल, अशी अपेक्षा होती. याबाबत ‘गोकुळ’चे नेते महादेवराव महाडिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी याबाबत आपणाला काहीच बोलायचे नसल्याचे सांगितले. याबाबत संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, अजून आपण परगावी आहोत. त्यात ज्यांनी आरोप केले त्यांनी आपणाला निवेदन दिले नसल्याने त्याबाबत काय बोलायचे? असे सांगून त्यांनीही तोंडावर बोट ठेवले आहे. (प्रतिनिधी)
शिळ्या कढीला ऊत
सतेज पाटील यांनी केलेले आरोप हे यापूर्वीही केलेले आहेत. त्यावेळी महाडिक यांच्यासह संचालकांनी उत्तर दिले होते. यापूर्वी संघावर अनेक वेळा टीका झाली आहे, त्यातून फारसे निष्पन्न झाले नाही. आताचे आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ असाच प्रकार असून, त्यावर चर्चा करण्यात ताकद वाया घालवायची नाही, अशी चर्चा ‘गोकुळ’च्या वर्तुळात सुरू आहे.

Web Title: The charges against Gokul were evicted from Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.