सीपीआरमध्ये विविध चाचण्यांचा दरफलक लावा
By Admin | Updated: December 16, 2014 00:41 IST2014-12-16T00:26:07+5:302014-12-16T00:41:57+5:30
ग्राहक हक्क समितीची मागणी

सीपीआरमध्ये विविध चाचण्यांचा दरफलक लावा
कोल्हापूर : जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण समितीच्या सदस्यांकडून सोमवारी झालेल्या बैठकीत सीपीआर रुग्णालयामध्ये विविध चाचण्यांचा दरफलक, वारनिहाय सेवा देणाऱ्या संबंधित डॉक्टरांच्या नावांचाही फलक लावण्याची सूचना करण्यात आली. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार होते.
वडापचे मनमानी दर, राधानगरी आगाराचा समान अंतरासाठी दरातील तफावत, वीज वितरणकडून होणाऱ्या गैरसोयी, वीज बिलातील तफावत, पतसंस्थांतील गैरव्यवहार, गॅस सिलिंडरचा काळाबाजार अशा समस्या मांडण्यात आल्या. पोलीस, परिवहन, औषधी प्रशासन, वीजवितरण, आरोग्य या विभागातील समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने टोल फ्री हेल्पलाईन सुरू कराव्यात, अशी सूचनाही करण्यात आली.
जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण समितीच्या सदस्यांनी ग्राहकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करावी. ग्राहकांच्या अडचणी, समस्या सोडवायच्या असतील जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण समितीच्या अखत्यारीतील प्रश्न मांडणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या तक्रारी लिखित स्वरूपात असाव्यात, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले. उपमहापौर मोहन गोंजारे, समितीचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, साहाय्यक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष संजय हुक्केरी, जिल्हा सहसंघटक सतीश फणसे यांच्यासह समितीचे अन्य सदस्य व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)