चराटी, नरसिंगराव, गायकवाड, यड्रावकरांचा गुलाल पक्का

By Admin | Updated: May 6, 2015 00:24 IST2015-05-06T00:22:52+5:302015-05-06T00:24:16+5:30

जिल्हा बॅक निवडणूक : उद्या निकालाची औपचारिकता, कल स्पष्ट

Charati, Narasingrao, Gaikwad, Yadravakkar's Gulal Pucca | चराटी, नरसिंगराव, गायकवाड, यड्रावकरांचा गुलाल पक्का

चराटी, नरसिंगराव, गायकवाड, यड्रावकरांचा गुलाल पक्का

राजाराम लोंढे - कोल्हापूर mकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक निवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी लागणार असला तरी मतदानानंतर प्रमुख लढतीतील कल लक्षात येतो. हसन मुश्रीफ, अशोक चराटी, नरसिंगराव पाटील, मानसिंगराव गायकवाड, संतोष पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, के. पी. पाटील, निवेदिता माने, संजय मंडलिक यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांचा गुलाल पक्का मानला जात आहे.
जिल्हा बॅँकेसाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील हवाच गेली होती. त्याचबरोबर त्यांनी मंडलिक गट व विनय कोरे यांना बरोबर घेऊन निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजपने सहाजणांचे पॅनेल करून आव्हान देण्याचा प्रयत्न केला; पण संस्थात्मक पातळीवर दोन्ही कॉँग्रेसची पकड असल्याने त्यांचेच पारडे जड राहिले. विकास संस्था गटात नेत्यांनी सोयीची भूमिका घेतल्याने मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. चंदगडमध्ये नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील यांच्यात लढत झाली. येथे काट्याची टक्कर असली तरी नरसिंगराव बाजी मारतील, असा अंदाज आहे. आजऱ्यामध्ये जयवंतराव शिंपी व अशोक चराटी यांच्यातील निकराच्या झुंजीत चराटी यांचे पारडे जड आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ, भुदरगडमध्ये के. पी. पाटील, शाहूवाडीत मानसिंगराव गायकवाड, गडहिंग्लजमध्ये संतोष पाटील यांच्या विजयाची केवळ औपचारिकता राहिलेली आहे. शिरोळमध्ये बॅँकेचे माजी संचालक विठ्ठलराव नाईक-निंबाळकर व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या जोरदार लढत झाली. येथे राजेंद्र पाटील हे बाजी मारणार हे निश्चित आहेत. गगनबावड्यात पी. जी. शिंदे व मानसिंग पाटील यांच्यात लढत झाली. येथे शिंदे यांच्या १८ संस्थांवर पाटील गटाने, तर पाटील यांच्या पाच संस्थांवर शिंदे यांनी हरकत घेतली आहे.
एकंदरीत निवडणुकीतील समीकरणे व मतांची गोळाबेरीज पाहता कृषी पणन संस्था गटातून संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, इतर शेती संस्था गटातून भैया माने, इतर मागासवर्गीय गटातून विलासराव गाताडे, अनुसूचित जाती गटातून राजू आवळे, भटक्या-विमुक्त जाती अप्पी पाटील, महिला गटातून निवेदिता माने, उदयानी साळुंखे यांचा विजय पक्का मानला जात आहे.



गेले दहा-पंधरा वर्षांतील कोल्हापूरच्या राजकारणात प्रा. जयंत पाटील यांचे राजकारण हा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे; पण हीच भूमिका या निवडणुकीत त्यांना अडचणीची ठरणार आहे. त्यांनी आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक नेत्याला दुखावलेले आहे.बहुतांश नेत्यांनी पडद्यामागून, तर काहींनी उघड विरोध केल्याने त्यांना ही निवडणूक तितकीशी सोपी राहिलेली नाही.


संभाव्य विजयी -
कागल - हसन मुश्रीफ, शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर, आजरा - अशोक चराटी, चंदगड - नरसिंगराव पाटील, भुदरगड - के. पी. पाटील, गडहिंग्लज - संतोष पाटील, शाहूवाडी - मानसिंगराव गायकवाड, गगनबावडा - पी. जी. शिंदे
कृषी पणन संस्था - संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील, इतर शेती संस्था - भैया माने, इतर मागासवर्गीय - विलासराव गाताडे, अनुसूचित जाती - राजू आवळे, भटक्या विमुक्त - अप्पी पाटील, महिला - निवेदिता माने व उदयानी साळुंखे.

Web Title: Charati, Narasingrao, Gaikwad, Yadravakkar's Gulal Pucca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.