सुसंस्कारित समाजासाठी चरित्रग्रंथ प्रेरणादायी

By Admin | Updated: January 19, 2015 00:24 IST2015-01-18T23:02:08+5:302015-01-19T00:24:33+5:30

प्रकाश बोकील : वि. स. खांडेकर व्याख्यानमाला

Characteristics inspirational for well-educated society | सुसंस्कारित समाजासाठी चरित्रग्रंथ प्रेरणादायी

सुसंस्कारित समाजासाठी चरित्रग्रंथ प्रेरणादायी

कोल्हापूर : सुसंस्कार ही चरित्रग्रंथांची ताकद आहे. त्यामुळे संस्कारक्षम समाज आणि आदर्श नागरिक घडविण्यासाठी चरित्रग्रंथांचे वाचन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रकाश बोकील यांनी केले.येथील करवीर नगर वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘चरित्र वाङ्मयाचे संस्कारमूल्य’ हा व्याख्यानाचा विषय होता.
बोकील म्हणाले, आजच्या समाजासमोर चंगळवादी संस्कृतीचे आव्हान आहे. अशावेळी सुसंस्कारित समाजाच्या बांधणीसाठी पालकांनीच पाल्यावर पदोपदी संस्कार करणे आवश्यक आहे. खडतर काळातही समाजात चांगल्या संस्कारांचे बीज पेरता येते, याची प्रचिती सावित्रीबाई फुले, जिजाऊ, टिळक, रानडे, आगरकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्रग्रंथांत दिसून येते. या सर्वांनी समाजासाठी दिलेले योगदान, त्यांची दृष्टी आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासमान आहे.
भारतातील पहिल्या स्त्री-शिक्षिका सावित्रीबाई, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि आनंद यादव यांच्या जीवनचरित्राचा आढावाही यावेळी बोकील यांनी घेतला. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या मलाला युसूफजाईचा संदर्भ देत बोकील यांनी आपल्या हक्काच्या लढाईसाठी कोवळ्या वयातही अतिरेक्यांना सामोरे जाण्याचे धैर्य बाळगणारी मलाला घराघरांत घडली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी ल. रा. नसिराबादकर, उदय कुलकर्णी, राजाभाऊ जोशी उपस्थित होते. सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर गुरुदत्त म्हाडगुत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नंदकुमार मराठे यांनी आभार मानले.

Web Title: Characteristics inspirational for well-educated society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.