नागाळा पार्कमधील रहिवाशांच्या सोयीसाठी चॅनेलचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:40+5:302021-09-26T04:27:40+5:30
कोल्हापूर : येथील नागाळा पार्क प्रभाग क्रमांक १२ मधील चॅनेलचे काम स्वपैशातून रहिवाशांच्या सोयीसाठी केले आहे. महापालिकेचे काम सुरू ...

नागाळा पार्कमधील रहिवाशांच्या सोयीसाठी चॅनेलचे काम
कोल्हापूर : येथील नागाळा पार्क प्रभाग क्रमांक १२ मधील चॅनेलचे काम स्वपैशातून रहिवाशांच्या सोयीसाठी केले आहे. महापालिकेचे काम सुरू होईपर्यंत रहिवाशांच्या घरात पाणी जाऊ नये, यासाठी ते काम केल्याचा दावा माजी महापौर अर्जुन आनंद माने यांनी शुक्रवारी प्रसिध्दी पत्रकातून केला. आपल्या भागातील रस्ते, गटारे, मंडईच्या दुरवस्थेककडे लक्ष न देता नेहमी काहीतरी सनसनाटी बातम्या पेरण्याची सवय ठाणेकर यांनी सोडून द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
भाजपचे माजी गटनेते अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नागाळा पार्कमधील महापालिकेचे चॅनेलचे काम नियमबाह्यपणे सुरू असल्याचा आरोप केला होता. यावर माने यांनी पत्रकातून खुलासा केला आहे.
या पत्रकात म्हटले आहे, नागाळा पार्कमधील जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान परिसर, वारणा कॉलनी चौक, म्हाडा वसाहतीमध्ये जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे पाणी साठून राहिले. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होऊन डासांमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे चॅनेल मारून साठलेले पाणी काढण्याचे काम केले. माझ्या या प्रभागातील नागरिकांच्या सुविधेसाठी केलेल्या कामाला भ्रष्टाचार म्हणण्याआधी ठाणेकर यांनी आपल्या मतदार संघातील असुविधांकडे लक्ष दयावे. वांगी बोळ रस्ता, कपिलतीर्थ मंडईतील अस्वच्छतेकडे पाहावे.