तपासी अधिकारी बदला, अन्यथा बेमुदत आंदोलन
By Admin | Updated: September 1, 2014 23:03 IST2014-09-01T22:50:24+5:302014-09-01T23:03:44+5:30
निष्पापाला सोडा, खरा आरोपी पकडा : बसर्गे बलात्कारप्रकरणी संतोष मळवीकरांची पत्रकार परिषदेत मागणी

तपासी अधिकारी बदला, अन्यथा बेमुदत आंदोलन
गडहिंग्लज : बसर्गे येथील बलात्कार प्रकरणात संशयित म्हणून गजरगावचे ग्रामपंचायत सदस्य भारत शंकर पाटील या निष्पाप तरुणाला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे, असा आरोप करतानाच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्याकडून तपास काढून घ्या. आम्हीदेखील तपासाला सहकार्य करू, फेरतपास करून निष्पापाला सोडा व खऱ्या आरोपीला अटक करा, अन्यथा ९ सप्टेंबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष मळवीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.दुपारी मळवीकर यांनी येथील पोलीस उपअधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी संशयित आरोपीची पत्नी कविता, भाऊ महादेव यांच्यासह गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील प्रमुख नागरिक उपस्थित होते.मळवीकर म्हणाले, पीडित तरुणीने संशयित आरोपीला ओळखले नसतानाही आंदोलनाला बळी पडून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बेकायदेशीररीत्या चौदा दिवस ताब्यात ठेवून केवळ त्याच्याकडे पीडित तरुणीचा मोबाईल सापडला म्हणून त्याला अटक केली आहे. मात्र, खरा आरोपी उजळ माथ्याने बिनधास्त फिरत असून, पोलिसांना त्याची माहिती आहे.अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेला संशयित भारत हा बेंदरानिमित्त आदल्या दिवशी सासरी बसर्गेला गेला होता. घटनेच्यावेळी तो सासरच्या घरीच होता. त्यानंतर चारचाकीतून तो पत्नीसह दवाखान्याला गेला. त्यानंतर तो नातेवाइकांकडे हत्तरगीला गेला होता. केवळ सापडलेला मोबाईल त्याने वापरला म्हणून त्याला अटक झाली असून, त्याच्याविरुद्धच आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा डाव आहे, असा आरोपही अॅड. मळवीकरांनी केला. (प्रतिनिधी)
‘पीडिते’ची भेट का घडत नाही ?
राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे व स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी पीडित तरुणीची भेट घडविण्याची लेखी मागणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, महिना उलटला तरी ही भेट घडलेली नाही, याचे गौडबंगाल काय? अशी विचारणाही मळवीकरांनी केली.
मळवीकरांनी उपस्थित केलेले प्रश्न
पीडित तरुणीचा मोबाईल ज्याला सापडला, त्या संशयिताचा अल्पवयीन मेहुणा आेंकार व भारतची पत्नी कविता यांचे जबाब का नोंदविले जात नाहीत? पीडित तरुणीच्या मोबाईलमधील इनकमिंग-आऊटगोर्इंग कॉल्स् व मेसेजेसवरून खऱ्या
गुन्हेगाराचा छडा लावणे शक्य असतानाही तसे का झाले नाही ?पीडित तरुणीच्या तपासणीचा वैद्यकीय अहवाल अजून कसा मिळाला नाही?गंभीर गुन्ह्याच्या तपासाची माहिती पोलीस मीडियावाल्यांना बोलावून घेऊन सांगतात. मात्र, या प्रकरणात तसे का झाले नाही ?गुन्ह्यात वापरलेली निळ्या रंगाची मोटार व कपडे अजून कसे सापडले नाहीत. एका व्यक्तीकडून असा गुन्हा शक्य नसल्यामुळे खऱ्या आरोपीसह अन्य आरोपींना अटक करावी.पीडित तरुणीला न्याय मिळवून देताना संशयिताच्या पत्नीचा विचार झालेला नाही. बलात्काऱ्याची पत्नी म्हणून तिला अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, तिचा संसारउद्ध्वस्त होण्याची भीती आहे.एका महिलेला न्याय मिळवून देताना दुसऱ्या महिलेवर अन्याय का? असा सवालही मळवीकर यांनी केला.