'चंद्रगीतां'नी सखी मुग्ध
By Admin | Updated: October 10, 2014 22:59 IST2014-10-10T22:44:43+5:302014-10-10T22:59:43+5:30
लोकमत सखी मंच : चंद्राच्या साक्षीने रंगली मैफल

'चंद्रगीतां'नी सखी मुग्ध
कोल्हापूर : हळूहळू आभाळाच्या मध्यावर सरकणारा पौर्णिमेचा चंद्र आणि ‘गली में आज चॉँद निकला’, ‘चॉँद मेरा दिल,’ ‘रात्रीस खेळ चाले’ अशा एकाहून एक सुमधुर चंद्रगीतांचे स्वर वातावरणात एक वेगळाच उल्हास भरत होते. निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’ आयोजित, शाहू दूध प्रायोजित आणि शुभंकरोती सांस्कृतिक भवन सहप्रायोजित ‘चंदा रे चंदा’ या कार्यक्रमाचे. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून सखी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘सखी मंच’ने काल, गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता प्रल्हाद-विक्रम प्रस्तुत आॅर्केस्ट्रा रॉकिंग हिट्स-बीटस्च्या चंद्रगीतांच्या मैफलीचे आयोजन केले होते. त्याला सखींनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. शाहू दूधचे मार्केटिंग मॅनेजर सुनील मगदूम व शुभंकरोती सांस्कृतिक भवनच्या संचालिका राजमती सावंत याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. सखी मंच संयोजन समिती सदस्या जयश्री होस्पेटकर, उमा इंगळे, शाहीन मणेर, आशा माळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत झाले.
‘चौदहवी का चॉँद हो’ या गीताने मैफल सुरु झाली. गायक- निवेदक प्रल्हाद पाटील यांनी आपल्या बहारदार गायकीने त्यामध्ये रंग भरले. टाळ्या, शिट्ट्या आणि थेट रंगमंचावर येऊन नृत्य करीत सखींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. रसिका कुलकर्णी, स्नेहलता सातपुते (गायिका), विक्रम पाटील (कीबोर्ड), अनिकेत ससाने (ढोलकी), सूरज पाटील (आॅक्टोपॅड) यांच्या साथसंगतीने मैफल अधिकच सजली. इक्रा मणेर यांनी संयोजन साहाय्य केले. कार्यक्रमाची सांगता हिरवळीवर आयोजित मसाला दुग्धपानाने झाली. (प्रतिनिधी)