चांदोली धरण शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:20+5:302021-09-22T04:28:20+5:30

सरूड : ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे चांदोली (वारणा) धरण मंगळवारी शंभर ...

Chandoli dam is one hundred percent full | चांदोली धरण शंभर टक्के भरले

चांदोली धरण शंभर टक्के भरले

सरूड : ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे चांदोली (वारणा) धरण मंगळवारी शंभर टक्के भरले आहे . गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणातील पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे.

एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या वळवाच्या दमदार पावसामुळे या वर्षी उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी वारणा नदीतून पाण्याचा उपसा कमी झाल्याने जून महिन्यापर्यंत धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर २१ जुलै ते २५ जुलैदरम्यान झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन धरणातील पाणीसाठा ९० टक्केपर्यंत पोहचला.

या कालावधीमध्ये धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून तितक्याच मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वारणा नदीला महापूर आला होता. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणीसाठा २९ ते ३२ टीएमसीपर्यंत जैसे थे राहिला होता. त्यांनतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ९९ टक्केपर्यंत भरले. या काळातही धरणातून ८२०५ क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणाच्या सांडव्यातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजनिर्मितीगृहातून केवळ ५९७ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

फोटो ओळी :

चांदोली धरण मंगळवारी शंभर टक्के भरले आहे.

Web Title: Chandoli dam is one hundred percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.