चंदवाणी यांचा तडकाफडकी राजीनामा
By Admin | Updated: September 24, 2016 00:07 IST2016-09-24T00:07:39+5:302016-09-24T00:07:39+5:30
करवीर पंचायत समिती सभा : निवेदन, विनंती करूनही कामे होत नसल्याची नाराजी

चंदवाणी यांचा तडकाफडकी राजीनामा
कसबा बावडा : वारंवार तक्रारी करून, निवेदन देऊन, विनंती करूनही आपली कामे होत नसल्याच्या नाराजीतून गांधीनगरच्या जया प्रताबराय चंदवाणी यांनी करवीर पंचायत समिती सदस्य पदाचा शुक्रवारी तडकाफडकी
राजीनामा दिला. पती प्रताबराय चंदवाणी यांनी तो राजीनामा पंचायतच्या सुरू असलेल्या मासिक सभेतच सभापती स्मिता युवराज गवळी यांच्याकडे दिला. चंदवाणी यांच्या अचानकपणे आलेल्या राजीनाम्यामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली.
गांधीनगर येथील सि.स.नं. २७३५ व २७३६ या भूखंडावरील बेकायदेशीर बांधकाम वेळोवेळी तक्रारी, निवेदन देऊनही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांपासून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत व तहसीलदारांपासून थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व
स्तरांवर बांधकामाबाबत तक्रारी केल्या; परंतु मला न्याय मिळाला नाही. माझे पती प्रताबराय चंदवाणी यांनीही पंचायतचे पद भूषविले आहे. तरीही आमच्या कामाला महत्त्व दिले जात नाही. जर कामेच होत नसतील, तर पंचायत सदस्यत्वाचा उपयोग काय, म्हणून राजीनामा देत असल्याचे चंदवाणी यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, नेहमी दोन वाजता सुरू होणारी सभा शुक्रवारी अर्धातास उशिरा सुरू झाली. सभेला तुलनेने पुरुष सदस्यांची उपस्थिती फारच कमी होती. गटनेते भुजगोंडा पाटील यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय अवघ्या काही मिनिटांतच मंजूर केले. गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने सहायक गटविकास अधिकारी
एस. व्ही केळकर यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. सभेस पंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना प्रशासनाने सदस्यांना विचारात घ्यायला हवे, अशी सूचना भुजगोंडा पाटील यांनी मांडली. सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र आहे. त्यावर प्रशासनाने उपाययोजना केली आहे का? असा प्रश्न अरुणिमा माने यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी १५ आॅक्टोबरच्या क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर केला.
सभेत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर शेती अवजारे पुरविल्याबद्दल व्यंकटेश्वरा फौंडेशनचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांच्या उपस्थित करण्यात आला.
सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा
पंचायत समिती सदस्य जया चंदवाणी यांनी दिलेल्या राजीनाम्यासोबत एका निवेदनाची प्रत जोडली असून, त्यात माझे पती प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २६) आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
सभा शांततेत
सभेत दिलीप टिपुगडे, तानाजी आंग्रे, राजेंद्र सूर्यवंशी, सरदार मिसाळ हे नेहमी विविध प्रश्न विचारून सभेत प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडत असत; परंतु आजच्या सभेला वरील सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने सभा एकदम शांततेत आणि कमी वेळेतच झाली.