संधी चंदगड की गडहिंग्लजला?

By Admin | Updated: October 9, 2014 23:01 IST2014-10-09T21:39:36+5:302014-10-09T23:01:26+5:30

घरटी प्रचारावर भर : बहुरंगी लढतीच्या फायद्यासाठी रस्सीखेच

Chandigad's fort of hell? | संधी चंदगड की गडहिंग्लजला?

संधी चंदगड की गडहिंग्लजला?

राम मगदूम =--- गडहिंग्लज अपेक्षेप्रमाणे बहुरंगी लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले. त्यानंतरचा आठवडा ‘जोडणी’तच गेला. संभाव्य जोडण्या झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. घरटी प्रचार, पदयात्रा आणि बैठका व कोपरा सभा यावरच प्रमुख उमेदवारांचा भर आहे. जाहीर प्रचारांच्या तोफा अजून धडाडणार असल्या तरी बहुरंगी लढतीचा फायदा उठविण्यासाठीच रस्सीखेच सुरू आहे.
संध्यादेवी कुपेकरांची उमेदवारी दाखल करण्यासाठी आर. आर. पाटील येऊन गेले. त्यांच्या पहिल्याच सभेने ‘राष्ट्रवादी’ला ऊर्जा मिळाली. त्यानंतर संध्यादेवी व त्यांची कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी पायाला भिंगरी बांधली आहे.
डॉ. नंदिनी यांनीही यावेळी जयवंतराव शिंपी, प्रकाशराव चव्हाण, प्रकाश पताडे व सोमगोंडा आरबोळे यांची मदत मिळवली आहे. संग्रामसिंह यांचे सख्खे बंधू रामराजेदेखील त्यांच्यासोबत आहेत.
संग्रामसिंह कुपेकरांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून ‘जनसुराज्य’ची उमेदवारी मिळवली; परंतु यापूर्वी जनसुराज्यतर्फे लढलेले गोपाळराव पाटील व प्रकाशराव चव्हाण आणि शिंपी गट त्यांच्या हाती लागला नाही. जनसुराज्यचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी गडहिंग्लजमध्ये खास बैठका घेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.
१४ वर्षांचा राजकीय विजनवास संपवून नरसिंगराव व गोपाळराव एकत्र आले आहेत. सेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या नरसिंगराव पाटील यांना नेसरीच्या शाहू आघाडीतील हेमंत कोलेकर व महादेव साखरे यांची साथ मिळाली. त्यानंतर आजरेकरांसह गडहिंग्लजकरांची मते मिळविण्यासाठी त्यांची व्यूहरचना सुरू आहे.
राष्ट्रवादीचे दुसरे बंडखोर अप्पी पाटील हे जि. प. सदस्य आणि गडहिंग्लज कारखान्याचे संचालक आहेत. ‘आपल्या समाजा’च्या मतांसह अन्य मतांच्या बेरजेसाठी त्यांनीही जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत असणारे गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांनी संध्यादेवींना पाठिंबा दिला तरी संचालक भैरू पाटील-वाघराळकर हे त्यांच्यासोबत आहेत. ‘गोकाक’चे पाहुणे जारकीहोळी बंधूंची ‘रसद’ मिळाल्यामुळे त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. त्यांची बंडखोरी राष्ट्रवादीला डोकेदुखीची ठरली आहे.
काँगे्रसची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्यानंतर भरमूअण्णा पाटील यांनी काँगे्रसच्या पारंपरिक मतांसाठी काँगे्रसजनांची मदत मिळविण्यासाठी ताकद लावली आहे. जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांची कन्या प्रा. स्वाती कोरी यांचा प्रचार ‘एकला चलो रे’ सुरू आहे.
‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावर यांनाही नितीन पाटील यांच्या बंडखोरीचा फटका बसला आहे. मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी एका धावत्या प्रचार दौऱ्याने स्वाभिमानी टीमला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. चंदगडची आमदारकी चंदगडला जाणार की गडहिंग्लजमध्ये राहणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

चंदगड
एकूण मतदार
२,९७,७४२
प्रचारातील मुद्दे
वाढती बेरोजगारी
बंद स्थितीतील दौलत कारखाना
वादग्रस्त एव्हीएच प्रकल्प
‘काजू’चा हमीभाव
पर्यटन क्षेत्र विकास
कुणाबरोबर कोण ?
संध्यादेवी कुपेकर - जयवंत शिंपी, प्रकाशराव चव्हाण, सोमगोंडा आरबोळे, प्रकाश पताडे
नरसिंगराव पाटील - गोपाळराव पाटील, हेमंत कोलेकर, महादेव साखरे
अप्पी पाटील - भैरू पाटील-वाघराळकर

Web Title: Chandigad's fort of hell?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.