कोल्हापूर : आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत बलाढ्य नागपूर संघावर १-० अशी सडनडेथमध्ये मात करीत कोल्हापूर (केएसए) संघाने आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशीप पटकावली. सुमित घाडगे व आकाश भोसले ठरले हे विजयाचे शिल्पकार हिंगोली येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरचा सामना आज, सोमवारी नागपूर संघाबरोबर सामना झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेला सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहीला. उत्तरार्धात ७० व्या मिनिटाला नागपूरच्या खेळाडूने कोल्हापूरच्या कपिल साठेला धोकादायकरीत्या अडविले. याबद्दल पंचानी कोल्हापूर संघास पेनल्टी बहाल केली. यावर रोहीत कुरणे याने गोल नोंदवत १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी काही काळच राहीली. ८० व्या मिनिटास नागपूर संघाने गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. संपूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने पंचानी टायब्रेकरचा अवलंब केला. यामध्ये कोल्हापूरकडून श्रेयस मोरे, आकाश भोसले, रोहित कुरणे, माणिक पाटील यांनी गोल मारले. तर नागपूर संघानेही चार गोलची नोंद करीत ४-४ अशी बरोबरी साधली. टाय ब्रेक न झाल्याने सडनडेथचा अवलंब करण्यात आला. नागपूर संघाकडून मारलेला स्ट्रोक बदली गोलरक्षक आकाश भोसलेने तटविला. त्यामुळे सामना १-० असा सडनडेथवर कोल्हापूर संघाने जिंकला. सामन्यात संदीप पोवार, श्रेयस मोरे, शकील पटेल, आकाश भोसले, माणिक पाटील, रोहित कुरणे, कपिल साठे, गोलरक्षक शरद मेढे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या संघास प्रा. अमर सासने व व्यवस्थापक राजेंद्र चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. (प्र्रतिनिधी)
कोल्हापूरला अजिंक्यपद
By admin | Updated: February 3, 2015 00:30 IST