राष्ट्रवादीला महाआघाडीचे आव्हान
By Admin | Updated: November 10, 2016 00:17 IST2016-11-10T00:00:21+5:302016-11-10T00:17:39+5:30
कागल नगरपालिका : मुश्रीफांना एकाकी झुंझावे लागणार; मंडलिक-घाटगे एकत्र

राष्ट्रवादीला महाआघाडीचे आव्हान
जहाँगीर शेख - कागल -कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर भाजप-शिवसेना मित्रपक्षांची मिळून महाआघाडीची घोषणा झाली असून, यामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. प्रा. संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीशी आमदार हसन मुश्रीफ यांना एकाकी झुंझावे लागणार आहे.
नगरपालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून कागलमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ‘कमळ’ चिन्हावरचा असेल, असे प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरू केले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला रोखायचे असेल तर मुश्रीफांना त्यांच्या कागलमध्ये पहिल्यांदा घेरावे लागेल, हे ओळखून त्यांनी नियोजन केले. समरजितसिंह घाटगेंच्या भाजप प्रवेशानंतर कागलमध्ये महाआघाडी होणार, याची जोरदार चर्चा झाली. आमदार मुश्रीफ यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन माझ्या विरोधात राजकीय षङ्यंत्र रचले जात असून, माझा अभिमन्यू केला जात आहे, असे कार्यकर्त्यांना सांगितले. यातून एकाकी लढण्याची तयारी करून घेतली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना मात्र ‘आघाडी की महाआघाडी’ असा नवा प्रश्न समोर आला. महाआघाडीच्या जागावाटपात बोलणी फिस्कटू लागली. कागलमध्ये समरजितसिंह घाटगेंनी, तर मुरगूडमध्ये प्रा. संजय मंडलिकांनी टोकाची भूमिका घेतली. या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी कागलच्या राजकीय घडामोडीची अचानक दिशा बदलली. अनपेक्षितपणे मुश्रीफ-मंडलिक गटात बोलणी सुरू होऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागावाटप निश्चित झाले. १५ जागा राष्ट्रवादीला आणि ५ जागा शिवसेनेला असे ठरल्याचे आणि मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते बाबगोंड पाटील आणि चंद्रकांत गवळी यांच्या सहीने जागा वाटपाचा करार प्रसिद्ध झाल्याने जिल्हाभर खळबळ उडाली.
या महाआघाडीचे पडसाद राज्यपातळीवर उमटले. अखेर प्रा. संजय मंडलिकांना घेऊन प्रवीणसिंहराजे घाटगे आणि समरजितसिंह घाटगे रात्री नऊ वाजता कागल शहरात आले आणि मुश्रीफ गटाशी कोणतीही आघाडी आम्ही केलेली नाही, हे जाहीर केले. असे असले तरी बाबगोंड पाटील, चंद्रकांत गवळी हे मंडलिक साखर कारखान्याचे संचालक मुश्रीफांशी केलेल्या आघाडीवर ठाम होते. अशा वातावरणात हा आठवडा आघाडी की महाआघाडी या चर्चेत गेला. शेवटी मंगळवारी मुश्रीफ यांच्या विरोधात महाआघाडीची घोषणा झाली आहे. यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचा लढाईचा मार्ग मोकळा झाला आहे. कागल शहरात आता रंगतदार राजकीय लढाई दिसणार आहे.
शिवसेनेचा उमेदवार कोण?
महाआघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार १८ जागा भाजप, तर एक जागा शिवसेना आणि एक शेतकरी संघटनेला, असे ठरले आहे. सागर कोंडेकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहेच. आता एका जागेवर शिवसेनेचा कोणता उमेदवार असेल, याची उत्सुकता आहे.
चंद्रकांत गवळींच्या भूमिकेकडे लक्ष
मुश्रीफ गटाशी आघाडीचा निर्णय घेणारे मंडलिक साखर कारखान्याचे संचालक बाबगोंड पाटील आणि चंद्रकांत गवळी यांच्या भूमिका गुलदस्त्यात होत्या.
मात्र, मंगळवारी महाआघाडीच्या जागा वाटपावर सही करून
बाबगोंड पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता कागलमध्ये श्रीनाथ सहकार
समूह उभारणारे चंद्रकांत गवळी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष वेधले आहे.