स्वाभिमानीसमोर गड राखण्याचे आव्हान

By Admin | Updated: February 17, 2017 00:51 IST2017-02-17T00:51:16+5:302017-02-17T00:51:16+5:30

शिरोळ तालुका : वर्चस्वासाठी चुरशीच्या लढती; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपमुळे रंगत

Challenge to keep a fort in front of self-respect | स्वाभिमानीसमोर गड राखण्याचे आव्हान

स्वाभिमानीसमोर गड राखण्याचे आव्हान

संदीप बावचे --- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषदा व चौदा पंचायत समितींसाठी निवडणूक होत आहे. तालुक्यात जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे हा तालुका स्वाभिमानीचा गड मानला जातो. गत निवडणुकीत दुरंगी लढत झाली होती. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मत विभाजनाचा धोका स्वाभिमानीसमोर आहे. त्यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान असणार आहे.
आमदारकीनंतर शिरोळ तालुक्यात विधानसभेचा गड जिंकण्यात खासदार राजू शेट्टी यांना यश आलेले नाही. सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पैरा फेडण्याच्या निमित्ताने खा. शेट्टी रिडालोसो सोबत गेल्याने घरचे मैदान नांगरायचे राहूल गेले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचा मित्र पक्ष म्हणून स्वाभिमानीने काम केले. या निवडणुकीतही शिरोळ विधानसभा स्वाभिमानीला जिंकता आली नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले राजू शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यात गतवेळी जिल्हा परिषदेच्या आठ पैकी पाच जागा स्वाभिमानीने जिंकल्या. दोन काँग्रेसला, तर एक राष्ट्रवादीला जागा मिळाली. पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी स्वाभिमानीला आठ, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सहा व दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. अपक्षांच्या मदतीने इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर स्वाभिमानीने झेंडा लावला. दुरंगी, तिरंगी लढतीत गतवेळी स्वाभिमानीला तालुक्यात यश मिळाले होते. यंदा स्वाभिमानीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व सेना-भाजपचे आव्हान आहे. अनेक गट, गणात तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढतीचे चित्र आहे. यामुळे गड राखण्याचे स्वाभिमानीसमोर मोठे आव्हान बनले आहे.


या ठिकाणी काँटे की टक्कर
शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषद मतदारसंघापैकी दत्तवाड, नांदणी, दानोळी, आलास या चार मतदारसंघात काँटे की टक्कर अशी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपने तगडे उमेवार दिल्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे. पंचायत समितीच्या कोथळी, गणेशवाडी, अकिवाट व अब्दुललाट या खुल्या मतदारसंघातून निवडून येणारा सदस्य सभापती होणार असल्याने याठिकाणी ईर्षा पेटली आहे.


विजयासाठी सर्व काही
जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी
२१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. घोडामैदान जवळ आले असून,
केवळ चार दिवस शिल्लक राहिले
आहेत. परिणामी, प्रत्येक उमेदवार प्रचाराचा फड रंगविण्यात व्यस्त
झाल्याचे दिसून येत आहे.
बैठका, प्रचार रॅली, गृहभेटी, कोपरा सभा यांसह अन्य फंडे आत्मसात करीत उमदेवार व कार्यकर्ते जिवाचे रान करीत आहेत. यात साम, दाम, दंड, भेद या चतु:सुत्रीचा वापर करीत विजयासाठी सर्वकाहीची प्रचिती मतदारसंघात उमेदवार व नेत्यांकडून दिसून येत आहे.


वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार : शिरोळ तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरदचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर करीत आहेत. तर स्वाभिमानीचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी, सावकर मादनाईक, तसेच भाजपकडून अनिल यादव, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर व शिवसेनेकडून आमदार उल्हास पाटील नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईत कोण जिंकणार, हे मतदारांवर अवलंबून आहे.

Web Title: Challenge to keep a fort in front of self-respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.