विजयाची हंडी फोडण्याचे दिलीप पाटील यांच्यासमोर आव्हान
By Admin | Updated: April 13, 2015 00:36 IST2015-04-13T00:35:40+5:302015-04-13T00:36:33+5:30
उमेदवारी देताना संघातील त्याग, कर्तृत्वापेक्षा नेत्यांच्या हुजरेगिरीला महत्त्व देऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोण उपयुक्त ठरतो, याचाच विचार करून

विजयाची हंडी फोडण्याचे दिलीप पाटील यांच्यासमोर आव्हान
गणपती कोळी - कुरुंदवाड- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची हंडी पुन्हा शिरोळमध्येच राखण्यात दिलीप पाटील यशस्वी झाले आहेत. हातकणंगलेला पुन्हा मिळालेली हुलकावणी, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी घेतलेली भूमिका व विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे पाटील यांना हंडी फोडण्यास मोठी कसरत करावी लागणार आहे.विधानसभेची उमेदवारी नसली तरी चालेल मात्र, गोकुळचे संचालकपद मिळावे, असे म्हटले जाते. त्यासाठी इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी तर विद्यमानांची उमेदवारी टिकविण्यासाठी धडपड सुरू असते. गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनीही उमेदवारी देताना संघातील त्याग, कर्तृत्वापेक्षा नेत्यांच्या हुजरेगिरीला महत्त्व देऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोण उपयुक्त ठरतो, याचाच विचार करून उमेदवारी दिली जाते.
गोकुळमध्ये नेत्यांचीही भागिदारी आहे. १९९८ मध्ये तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांच्या कोट्यातून हातकणंगले तालुक्यातून अरुण इंगवले यांना उमेदवारी मिळाली होती. हातकणंगलेमध्ये ७६, तर शिरोळमध्ये ११७ सभासद आहेत. त्यामुळे दोन तालुक्यांना मिळून एक उमेदवार दिला जातो. २००३च्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी दिलीप पाटील यांच्या रूपाने शिरोळला संधी दिली. २००८ मध्ये हातकणंगले तालुक्याच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले, मात्र त्यावेळीही आप्पांची कृपादृष्टी पुन्हा शिरोळच्या पाटलांवरच पडली.
पाटील यांची शेवटचीच संधी असे मानले जात असताना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण आले. त्यांचे व पाटील यांचे निकटचे संबंध असल्याने पाटील यांचे गोकुळमध्ये वजन वाढून अचानक ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले. आप्पांची मर्जी अन् बाबांची कृपा यातून शेवट टर्मला अध्यक्षपदाची संधी मिळाली. नवीन सहकार धोरण, लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे पंचवार्षिक कालावधी वाढून मिळाला. तालुक्यातून स्वाभिमानी दुधाच्या कडव्या स्पर्धेतही संकलन वाढवून पाटील यांनी आपले कर्तृत्वही सिद्ध करून दाखविले अन् राजकीय सत्तासंघर्षातही पुन्हा आपली उमेदवारी टिकून गोकुळची हंडी तालुक्यात राखण्यात यशस्वी झाले.
कोल्हापुरात महाडिक व सतेज पाटील यांचा पेटलेला संघर्ष यातून विरोधकांची आक्रमक भूमिका, त्यातच विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीविरोधात घेतलेली भूमिका. हातकणंगले तालुक्याच्या पदरी आलेली पुन्हा निराशा त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यात गोकुळची हंडी मिळाली असली तरी फोडण्यासाठी ती आव्हानात्मक ठरणार आहे.
हातकणंगलेवासीयांतील बेकी पाटलांच्या पथ्यावर
पाटील यांच्या दुसऱ्या टर्मलाच हातकणंगलेला संधी मिळावी यासाठी प्रयत्न झाले; मात्र हातकणंगलेमध्ये इच्छुकांत एकमत न झाल्याने पाटील यांना पुन्हा संधी मिळाली. यावेळी त्यांचा पत्ता कट होणार व अमल महाडिक यांच्या रूपातून हातकणंगलेला संधी मिळणार हे निश्चित मानले जात होते. परंतु राज्याच्या मुख्यमंत्रिपदी चव्हाण आल्याने पाटील यांचे गोकुळमधील राजकीय वजन वाढून अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यातच विधानसभा निवडणुकीत महाडिकांचा विजयही पाटील यांच्या पथ्यावर पडला. उमेदवार निवडीत अध्यक्षाला वगळणे नैतिकदृष्ट्या शेवटच्या टर्मला मिळालेले अध्यक्षपदही लाभदायक ठरले. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला नशिबाने साथ दिल्याने गोकुळमधील आपले अस्तित्व टिकविण्यात यशस्वी ठरले.