मुरगूड गणेशोत्सवात डॉल्बीचे आव्हान
By Admin | Updated: August 28, 2014 23:41 IST2014-08-28T23:22:32+5:302014-08-28T23:41:27+5:30
पोलिसांचे मौन : मंडळांना योग्य मार्गदर्शनाची गरज

मुरगूड गणेशोत्सवात डॉल्बीचे आव्हान
अनिल पाटील -मुरगूड -संपूर्ण महाराष्ट्राला डॉल्बीमुक्तीचा संदेश देणारा कोल्हापुरातील गणेशोत्सव नक्कीच कौतुकास्पद ठरला; पण यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशाचे आगमन होत असल्याने तरुण मंडळांनी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, मुरगूड शहरासह परिसरामध्येही पोलिसांनी डॉल्बीमुक्तीसाठी विशेष प्रयत्न न केल्याने मंडळांचे कार्यकर्ते ‘झाली तर होऊ दे केस, पण काहीही करून लावणारच बेस’ असे उघडउघड बोलत आहेत. त्यामुळे यावर्षी मुरगूड शहरासह परिसरामध्ये डॉल्बीचा दणदणाट सुरूच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉल्बीच्या आवाजाला आवर घालण्याचे मुरगूड पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन डॉल्बीमुक्तीचे अभियान यशस्वी करून दाखविले. संपूर्ण महाराष्ट्राने कोल्हापूरचे कौतुक केले. दरम्यान, याच काळात मुरगूड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दत्तात्रय भापकर व अजितसिंह जाधव यांनी स्थानिक पत्रकारांना विश्वासात घेऊन शहरासह कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. डॉल्बीबाबत मते जाणून घेतली आणि गणेशोत्सवच नव्हे, तर लग्न-वरातीमध्येही डॉल्बीमुक्तीची योजना यशस्वी झाली. पोलिसांना या सर्वांचा विसर पडला आहे. काही जाणकरांनी याबाबत आठवण करून दिल्यानंतर पोलिसांच्या गावांत बैठका झाल्या. मुरगूड शहरामध्ये झालेल्या बैठकीला तर कार्यकर्ते अत्यल्प हजर राहिले. यातून पोलिसांची भीती कमी झाली, की बैठकीचे नियोजन व्यवस्थित झाले नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्फे गणराया अवॉर्ड देऊन मंडळांचा सन्मान केला आहे. मुरगूड पोलीस ठाणे मात्र सुस्तावलेले दिसते. डॉल्बी लावला तर कारवाई करून डॉल्बी जप्त करण्याचे धाडस याच पोलिसांनी केले आहे; पण यावेळी शांत राहण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
मानसिकता बदलण्याची गरज
शहरातील तसेच ग्रामीण भागातील मंडळांना किती डिसेबलपर्यंत आवाज वाढविता येतो, कोणत्या वेळी स्पिकर लावावा, कधी बंद ठेवावा, मिरवणुकीचे नियोजन कसे असावे, याबाबत योग्य मार्गदर्शन झाल्यास कोणताच अनुचित प्रकार घडणार नाही. यासाठी गणेशोत्सव काळात चौकाचौकांतील मंडळांच्या सूचनाफलकांवर नियम लिहिण्याचे बंधनकारक करावे.
गेल्या दोन वर्षांपासून मंडळांचे देखावे, मूर्ती यांना पुरस्कार न देण्याची प्रथा मुरगूड पोलिसांनी मोडून यावेळी सर्व मंडळांच्या देखाव्यांचे परीक्षण करून निदान पुढील वर्षापासून मुरगूड पोलीस ठाण्याच्यावतीने गणराया अवॉर्ड सुरू करावा, अशी मागणीही अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
झाली तर होऊ दे केस, लावणारच चार-पाच बेस ! तरुण मंडळांची मानसिकता
डॉल्बीचा दणदणाट सुरूच राहणार