गांधीनगरात मटक्याच्या वादातून चाकूहल्ला
By Admin | Updated: August 17, 2014 00:53 IST2014-08-17T00:52:03+5:302014-08-17T00:53:16+5:30
एकजण गंभीर : तलवारीनेही वार; भर बाजारपेठेतील घटनेने व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

गांधीनगरात मटक्याच्या वादातून चाकूहल्ला
वसगडे : मटका घेण्याच्या वादातून गांधीनगर (ता. करवीर) येथे एकावर चाकूसह तलवारीने प्राणघातक हल्ला करण्याची घटना आज, शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. गोपाळ बलराम राजपूत (वय ४०, रा. गांधीनगर) असे जखमीचे नाव आहे. घटनेची नोंद गांधीनगर पोलिसांत झाली आहे. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गोपाळ राजपूत हा गांधीनगर येथील एका बारमध्ये मटका घेत होता, तर गणेश शेळके हा फिरून मटका घेत असे. मटक्याच्या वादातून महिन्याभरापूर्वी या दोघांमध्ये जोराचा वाद झाल्याचे समजते.
आज रात्री साडेनऊच्या सुमारास गोपाळ व त्याचा मित्र नारुमल दिवाणजी हे दोघे बारजवळील कैलाश चिकनवाला या गाड्यावर थांबले होते. त्यावेळी गणेश शेळके हा दुचाकीवरून तेथे आला व त्याने गोपाळला, तू माझ्या धंद्यामध्ये का आडवा येतोस? असे विचारत त्याच्याशी वाद केला. त्याने चाकूने गोपाळच्या हातावर वार घातला. त्यामुळे गोपाळ तेथून पळून जात असता त्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. त्याचवेळी गणेशने त्याच्यावर तलवारीने पाठीत व डोक्यात वार केले.
गणेशने नारुमल याच्यावरही तलवार हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो पळत सुटल्याने बचावला. भर बाजारपेठेत अचानक झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, गोपाळवर तलवारहल्ला झाल्याची माहिती त्याचा भाऊ मुकेशला कळाल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली. त्याने गोपाळला गांधीनगर वसाहत रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला सीपीआरला हलवण्यात आले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)