सभापती आवाडे गटाचा, उपसभापती महाडिक गटाचा
By Admin | Updated: September 1, 2015 23:46 IST2015-09-01T23:46:10+5:302015-09-01T23:46:10+5:30
वडगाव बाजार समिती : निवडी बिनविरोध होणार; सिंगतकरांवरील कारवाईमुळे ९ रोजी निवड कार्यक्रम

सभापती आवाडे गटाचा, उपसभापती महाडिक गटाचा
आयुब मुल्ला- खोची -वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सर्व गटांना सोबत घेऊन अगदी सोयीने आमदार महादेवराव महाडिक यांनी बिनविरोध केली. आता आज, बुधवारी होणारी सभापती, उपसभापती निवडही बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत. ही दोन्ही पदे अनुक्रमे विलास खानविलकर (रेंदाळ) व बापूसो मोठे (पट्टणकोडोली) यांच्या रूपाने तालुक्याच्या दक्षिण विभागाला मिळणार आहेत. या संदर्भात मंगळवारी राजाराम कारखान्यावर संचालकांची मते आजमावण्यात आली. आवाडे गटाला सभापती पद व महाडिक गटाला उपसभापती पद निश्चित झाले आहे. समितीचे कार्यालय तालुक्याच्या पश्चिमेस आणि पदे मात्र दक्षिण विभागाला एकाचवेळी मिळण्याचा योगायोग साधला जाणार आहे. महाडिक समर्थक संचालक जास्त असताना आमदार महाडिक यांनी आगामी राजकारण डोळ््यासमोर ठेवून सावध पाऊल टाकले आहे.
बाजार समिती ही तालुक्याच्या राजकारणाचे प्रमुख केंद्रबिंदू आहे. आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यानंतर या समितीवर महाडिक यांनीच आपले वर्चस्व ठेवले आहे. गतवेळी चुरशीने निवडणूक झाली. त्यावेळी फक्त विरोधी गटाचे बाळासाहेब माने हे एकमेव विजयी झाले. त्यांनाही महाडिक यांनी आपले समर्थक बनविले आहे. विद्यमान राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधारी गटाला विरोध होणे ही सोपी गोष्ट नव्हती. तरीसुद्धा दस्तुरखुद्द महाडिक यांनीच आवाडे, कोरे, माने, आवळे, यड्रावकर, हळवणकर गटाला सोबत घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आवाडे गटाला सहा, कोरे गटाला दोन, माने, आवळे, हाळवणकर गटाला एक जागा देत निवडणूकच बिनविरोध केली. हे करताना जुन्या ज्येष्ठ संचालकांना महाडिकांनी वगळले. नव्या चेहऱ्यांना संधी दिली. इतर पक्षांचा विरोधही मावळला. त्यामुळे एकहाती सत्ता येण्याची स्थिती असताना महाडिक यांनी बेरजेचे राजकारण करीत विरोधकांना सहकार्याने गणित घातले आहे.
स्वत:चे संचालक जास्त असताना आवाडे गटाला सभापती पद देण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी तसा निरोपही त्यांनी आपले विश्वासू कार्यकर्ते यांच्यामार्फत आवाडे यांना दिला. त्यानुसार माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महाडिक यांची भेट घेऊन आभार मानले व अडीच वर्षे संधी द्यावी, अशी मागणी केली. परंतु, मंगळवारी झालेल्या बैठकीत एकच वर्षे संधी दिली जाईल ठरले. यामध्ये आवाडे समर्थक विलास खानविलकर व उपसभापतीसाठी बापूसो मोठे यांची नावे निश्चित करण्यात आली. उपसभापतीसाठी महाडिक गटातील नूतन संचालक बी. जी. बोराडे (चावरे) यांचेही नाव चर्चेत होते.
वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम आज, बुधवारी होणार होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लाचप्रकरणात सापडलेले सिंगतकर हे होते. त्यामुळे आता या निवडी पुढील बुधवारी (दि.९) होणार आहेत. आजरा येथील उपनिबंधक पी. व्ही. पोवार निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
महाडिक यांनी आगामी विधान परिषद निवडणूक डोळ््यासमोर ठेवून राजकीय घडामोडी यशस्वी केल्या आहेत. विरोधकांना त्यांनी बरोबर घेतले आहे. महाडिक यांनीच निवडणूक बिनविरोध करण्याबरोबरच सभापती, उपसभापती पदांची नावे निश्चित केली आहेत.