कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ

By Admin | Updated: July 18, 2014 00:51 IST2014-07-18T00:44:15+5:302014-07-18T00:51:50+5:30

६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष : विकासापेक्षा खुर्चीचे राजकारण

The chair in the Kurundwar municipality | कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ

कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ

गणपती कोळी - कुरुंदवाड
येथील पालिकेतील नेत्यांचे टोकाचे राजकारण, दल बदलू नगरसेवक, प्रत्येकवेळी त्रिशंकू परिस्थिती, आदी कारणांमुळे या पालिकेला गेल्या ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षाला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही. खुर्चीसाठी राजकारण या धोरणामुळे शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही.
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड हे निमशहर आहे. २५ हजार लोकवस्ती असलेली ‘क’ दर्जाची नगरपालिका आहे. मात्र, येथील राजकीय नेत्यांची महत्त्वाकांक्षा, ईर्षा आणि सत्तेसाठी वाट्टेल ते अशा भूमिकेमुळे पालिका ‘क’ दर्जाची असली, तरी राजकारण मात्र ‘अ’ दर्जाचेच राहिले आहे. येथील राजकारण अनेकवेळा जिल्हा नव्हे, तर मुंबईच्या नेत्यांचीही डोकेदुखी ठरली आहे.
संस्थानकालीन असलेल्या शहरात १९५१ ला नगरपालिका अस्तित्वात आली. मात्र, नेत्यांचे टोकाचे व सोयीचे राजकारण, सत्तेसाठी दल बदलू नगरसेवक व पालिकेत त्रिशंकू परिस्थिती यामुळे पालिकेला ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. त्यापैकी २० वेळा प्रशासक व तहसीलदार यांना कार्यभार सांभाळावा लागला आहे. पहिले नगराध्यक्ष ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही, तर शं. रा. शिंदे, बाबासाहेब देसाई, भा. चि. निटवे यांच्याव्यतिरिक्त इतर नगराध्यक्षांना फार काळ खुर्ची टिकविता आली नाही.
शहरात रावसाहेब पाटील, रामचंद्र डांगे व जयराम पाटील हे तीन प्रमुख राजकीय गट असून, प्रत्येक
गट आपआपल्या प्रभागात अस्तित्व राखून आहे. त्यामुळे पालिकेच्या बहुतेक निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. निवडणुकीनंतर नेत्यांबरोबर नगरसेवकही सोयीचे राजकारण करीत असल्याने पालिकेला वारंवार राजकीय भूकंप बसत
असतो. शिवाय अलीकडच्या काळात सत्तेतील सर्वांना पदाची संधी यामुळे नगराध्यक्षपदाची यादी वाढतच
आहे. परिणामी, अल्प कालावधी, वारंवार राजकीय सत्तांतर यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे.
अशी मिळाली संधी
-ाालिकेच्या इतिहासात आ. कृ. माने, जयराम पाटील, कविता जोंग यांना दोनवेळा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली.
-जयराम पाटील १९८५ ते १९९१ व २००१ ते २००६ असे दोनवेळा एकूण ११ वर्षे नगराध्यक्ष पदावर राहणारे एकमेव नगराध्यक्ष ठरले आहेत.

Web Title: The chair in the Kurundwar municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.