‘चेन स्नॅचिंग’ने राजोपाध्येनगर हादरले
By Admin | Updated: April 6, 2015 01:14 IST2015-04-06T01:10:17+5:302015-04-06T01:14:06+5:30
११ तोळे दागिने लंपास : एकाच दिवशी सलग तीन घटना; नागरिकांत प्रचंड घबराट

‘चेन स्नॅचिंग’ने राजोपाध्येनगर हादरले
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत परिसरातील राजोपाध्येनगरात चेन स्नॅचिंगच्या सलग दोन घटना रविवारी घडल्या. यामध्ये सहा तोळ्यांचे दागिने चोरीस गेले. दरम्यान, याच परिसरात पोलीस असल्याचे भासवून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे. एकाच दिवशी झालेल्या या घटनामुळे नागरिकांत घबराटीेचे वातावरण आहे.
राजोपाध्येनगर येथील विद्या हनुमंत नलवडे (वय ३३, रा. इंदिरा पार्क) याच परिसरात असलेल्या जोतिबा मंदिर येथे महाप्रसादासाठी गेल्या होत्या. दुपारी महाप्रसादाचे जेवण करून घरी परतताना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. विद्या नलवडे यांनी याबाबतची फिर्याद दिली.
याचबरोबर पूजा महेश किल्लेदार (रा. राजोपाध्येनगर) या पतीसमवेत येत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले; पण पूजा किल्लेदार यांनी मंगळसूत्र हातात घट्ट धरल्याने चोरट्यांच्या हाती केवळ एक तोळ्याचे दागिने गेले.
दरम्यान, विमल शंकर इंगवले (वय ६५, रा. पोवार कॉलनी, वसंतराव देशमुख हायस्कूलजवळ) येथीलच एका मंगलकार्यात गेल्या होत्या. त्या घरी परतताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ‘पुढे चोरी झाली आहे. आम्ही पोलीस आहोत. तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने या रुमालामध्ये ठेवा,’ असे सांगितले. त्यावर विमल इंगवले यांनी गळ्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने रुमालामध्ये ठेवले. तो रुमाल त्या दोघांनी पुन्हा त्यांच्याजवळ दिला व तेथून निघून गेले. पुढे गेल्यावर विमल यांनी हा रुमाल उघडला असता त्यामध्ये सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इंगवले यांनी याबाबतची फिर्याद दिली.