सीईटीपी प्रकल्पाचे काम बंद पाडल
By Admin | Updated: November 11, 2014 23:25 IST2014-11-11T21:14:23+5:302014-11-11T23:25:19+5:30
तळंदगे ग्रामस्थ आक्रमक : जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले

सीईटीपी प्रकल्पाचे काम बंद पाडल
हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेला सीईटीपी प्लॅन्ट वनटाईम मेंटनन्स (दुरुस्ती)च्या नावाखाली बंद ठेवून विविध कंपन्यांमधून येणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यावर कोणत्याही प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया न करता हे प्रदूषित पाणी तळंदगे (ता. हातकणंगले) गावाच्या ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, ओढा परिसरातील पिके व गवत करपू लागले आहे. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी प्लॅन्टवर जाऊन याबाबतचा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले व प्लॅन्ट दुरुस्तीचे काम बंद
पाडले.
दरम्यान, ग्रामपंचायतीने औद्योगिक विकास महामंडळापासून शासनाच्या सचिवापर्यंत सर्वांकडे याप्रश्नी पत्रव्यवहार करून गावाच्या आरोग्याच्या समस्या, धोके व अडचणी मांडल्या आहेत; परंतु ग्रामपंचायतीने सुचविलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत गावाच्या झालेल्या आरोग्य व वित्तहानीस जबाबदार धरून औद्योगिक विकास महामंडळाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सरपंच मंगल वाघमोडे व उपसरपंच राजेंद्र हवालदार यांनी निवेदनाद्वारे दिली
आहे.
वनटाईम मेंटनन्स व आॅपरेशन करण्याकरिता २१ आॅक्टोबरपासून पुण्याच्या थर्म्याक्स कंपनीने हा प्लॅन्ट ताब्यात घेतला आहे. दुरुस्तीचे काम करण्यासाठी वसाहतीतील विविध कंपन्यांमधून येणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबविणे गरजेचे आहे. मात्र, या मुर्दाड कंपन्या जाणीवपूर्वक प्रदूषित पाणी प्लॅन्टकडे पाठवून देत आहेत. त्यामुळे प्लॅन्टची दुरुस्ती करणे, तीव्र स्वरूपाच्या रसायनापासून तयार झालेले व याठिकाणी साठवलेले ‘स्लज’ काढणे, वाळविणे अशा प्रकारच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. तसेच चालू स्थितीत पंप व एअर बोअरचे मेंटनन्सही करता येत नाही. अशी वस्तुस्थिती झाल्याने विविध कंपन्यांतून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी ताबडतोब बंद करावे, अन्यथा प्लॅन्ट दुरुस्तीचे काम करणे आम्हास अशक्य आहे, असे पत्रक थर्म्याक्स कंपनीचे इन्चार्ज आर. एस. जाधव यांनी पंचतारांकित औद्योगिक सीईटीपी प्लॅन्टचे चेअरमन गुप्ता यांना देऊन दुरुस्तीचे कामही ग्रामस्थांच्या रुद्रावतारामुळे थांबविले.
चार दिवसांपासून रसायनमिश्रित प्रदूषित पाणी
तळंदगेचे ग्रामदैवत श्री जगन्नाथ देवाच्या यात्रा काळात सर्व ग्रामस्थ व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत गेल्या चार दिवसांपासून रसायनमिुश्रत प्रदूषित पाणी सरळसरळ गावाच्या ओढ्यात सोडण्यात येत होते. या प्रदूषित पाण्याची दुर्गंधीची तीव्रता गावापर्यंत पोहोचताच संतप्त झालेले उपसरपंच राजेंद्र हवालदार, सागर चौगुले, अविनाश भोजकर, तानाजी शिंदे आदींनी ग्रामस्थासह धाव घेऊन सीईटीपी प्लॅन्टवर जाऊन दुरुस्तीचे काम बंद पाडले. दुरुस्तीचा ठेका घेणाऱ्या थर्म्याक्स कंपनीच्या व औद्योगिक विकास महामंडळाच्या तसेच सीईटीपी को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.