‘सीईटीपी’वर पुन्हा हल्लाबोल

By Admin | Updated: September 6, 2014 00:26 IST2014-09-06T00:18:21+5:302014-09-06T00:26:39+5:30

तळंदगे ग्रामस्थ आक्रमक : खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर; टेबल, खुर्च्या, कंट्रोल रूमची तोडफोड

'CETP' again attacked | ‘सीईटीपी’वर पुन्हा हल्लाबोल

‘सीईटीपी’वर पुन्हा हल्लाबोल

हुपरी : रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यामुळे गेली अनेक वर्षे त्रास भोगत असलेल्या तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामस्थांनी संतप्त होऊन ‘सीईटीपी’ प्रकल्पाच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली. यामध्ये कार्यालयाचा दरवाजा, खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर झाला. कार्यालयातील टेबल, खुर्च्या व कंट्रोल रूमची तोडफोड करण्यात आली. या प्रकल्पाची ठेकेदार कंपनी ‘ग्लोबल इन्व्हॉर्स’च्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास गोकुळ शिरगाव पोलिसांनी केलेली टाळाटाळ व प्रदूषण महामंडळ, तसेच औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत होऊन उद्रेक झाला. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांत रसायनमिश्रित तीव्र स्वरूपाच्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने तळंदगे (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत ‘सीईटीपी’ प्रकल्प उभारला आहे. तसेच प्रकल्पाच्या तरसरी प्लँटचीही उभारणी केली आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये प्रदूषित पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते पाणी तळंदगे गावच्या ओढ्यामध्ये सोडले जाते. परिणामी, या प्रदूषित पाण्यामुळे ओढे, नाले, विहिरी, कूपनलिकेतील पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे तळंदगे व इंगळी गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच काही जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता ‘सीईटीपी’ प्रकल्पावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता रसायनयुक्त पाणी ओढ्यात सोडत असल्याचे पाहून हा प्रकल्प चालविण्यास घेणाऱ्या ‘ग्लोबल इन्व्हॉर्स’ या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोकुळ शिरगाव पोलिसांत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.
या घटनेमुळे संतप्त झालेले सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हावलदार, सदस्य रघुनाथ कोळेकर, अविनाश भोजकर, संतोष पाटील, परशराम कांबळे, सागर चौगुले, नंदकुमार सलगर, सदाशिव चौगुले यांच्यासह अनेक ग्रामस्थ ‘सीईटीपी’ प्रकल्पावर आले.
त्यांनी प्रदूषण महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी सुजित ढोलम, गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे, औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी यांना प्रकल्पावर येण्याची विनंती केली. मात्र, यापैकी कोणीही न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ‘सीईटीपी’च्या कार्यालयावर तुफान दगडफेक करीत कार्यालयाचा दरवाजा, खिडक्यांच्या काचा व आतील साहित्य, तसेच कंट्रोल रूमची मोडतोड केली.
हा प्रकार घडल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच
गावच्या ओढ्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्याचा पंचनामा मंडल अधिकारी के. एस. कोळी, तलाठी एच.
आर. शेडशाळे, आदींनी केला. (वार्ताहर)

Web Title: 'CETP' again attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.