शताब्दीतच ‘संगीतसूर्य’ तळपावा !
By Admin | Updated: August 8, 2014 00:39 IST2014-08-07T23:49:03+5:302014-08-08T00:39:04+5:30
केशवराव भोसले नाट्यगृह : कोल्हापूरची नाट्यचळवळ पडली थंड; नूतनीकरणास वेग गरजेचा

शताब्दीतच ‘संगीतसूर्य’ तळपावा !
इंदुमती गणेश - कोल्हापूर -- युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते १९१५ साली कोल्हापुरात ‘पॅलेस थिएटर’ या नावाने नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ असे नामकरण झाले. या नाट्यगृहामुळे कोल्हापूरची नाट्यपरंपरा बहरत गेली. देशभरात कोल्हापूरची ‘कलापूर’ अशी नवी ओळख रुजली. अनेक दिग्गज कलाकार येथे तयार झाले; मात्र कालांतराने महापालिकेकडे ताबा गेल्यावर नाट्यगृहाच्या दुर्र्दैवाचा फेरा सुरू झाला.
नूतनीकरणाचा प्रयोग दोनवेळा फसल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी
२०११-१२ साली अर्थसंकल्पात केलेल्या दहा कोटींच्या तरतुदींमुळे नाट्यगृहाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: जातीने नाट्यगृहाच्या कामाकडे लक्ष दिल्याने महापालिकेनेही ते मनावर घेतले आणि आता नूतनीकरणाचे काम जोमाने सुरू आहे.
नाट्यगृह १५ जानेवारीपासून बंद ठेवण्यात आले असले, तरी वर्क आॅर्डर निघून प्रत्यक्ष कामाला १५ मार्चपासून सुरुवात झाली. नाट्यगृहाची इमारत हेरिटेज वास्तू असल्याने त्यासंबंधी अधिक काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. आता नाट्यगृहाची अंतर्गत डागडुजी, गळती काढणे, दगडी बांधकाम मजबूत करणे, बाल्कनी ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. सध्या रंगमंचावरील नूतनीकरणाचे काम सुरू असून, त्याखाली असलेल्या विहिरीलाही गिलावा करण्यात आला आहे.
खासबाग मैदानातील दगडी बांधकाम पूर्ण झाले असून, लॉनची लागवड करण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी देण्यात आलेल्या निधींपैकी खासबाग मैदानावर ७२ लाख रुपये, तर नाट्यगृहावर सव्वा कोटी रुपये खर्च झाले आहेत.
पुढील वर्षी म्हणजे २०१५ मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर एक वर्षाच्या आत नाट्यगृहाचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. केवळ नाट्यगृहाअभावी थंड पडलेली नाट्यचळवळ पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल आणि कोल्हापूरचे गतवैभव काही अंशी मिळविण्यात यश येईल.