हातकणंगलेच्या मस्जिदीला शतकाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2015 01:02 IST2015-07-03T01:02:49+5:302015-07-03T01:02:49+5:30

तालुक्यात १२0 प्रार्थनास्थळे : बहुतेक गावात धार्मिक कार्यक्रमांची लगबग--महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

Century history of Hatkanangle mosque | हातकणंगलेच्या मस्जिदीला शतकाचा इतिहास

हातकणंगलेच्या मस्जिदीला शतकाचा इतिहास

दत्ता बिडकर- हातकणंगले
पवित्र रमजान महिन्यात रोजे, नमाज, तरावीह पठण याद्वारे अल्लाहची मर्जी, आशीर्वाद मिळविण्यात प्रत्येक मुस्लिम बांधव धार्मिक विधीचे आचरण करीत आहे. अशीच प्रचिती हातकणंगले तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यात सर्वसाधारण लहान, मोठ्या १२० मस्जिदीमधून नमाज पठण होते.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मरकजच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी २९ विभाग करण्यात आले आहेत. त्यापैकी हातकणंगले तालुका हा विभाग आहे. या विभागांतर्गत हातकणंगले, शिरोळ, रुकडी, वडगाव, हुपरी, पट्टणकोडोली, वाठार तर्फे वडगाव या सात विभागांचा समावेश होतो. तालुक्यातील सर्वसाधारण १२० मस्जिदीमध्ये धार्मिक आचरण होत असते. सध्या येथे रमजान महिन्यातील रोजा इफ्तार, तरावीह, नमाज पठण यासाठी मुस्लिम बांधवाची लगबग पाहावयास मिळते.
हातकणंगले गावच्या मध्यवर्ती भागात १०० वर्षांपूर्वीची मस्जिद आहे. समाजबांधवांच्या लोकवर्गणीतून त्याची डागडुजी करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी सर्वसाधारण २० लाख खर्चून त्याची सजावट करण्यात आली आहे. हातकणंगलेचे अमीरसाहब म्हणून मुबारक मुजावर गेली दहा वर्षे पदभार सांभाळत आहेत. मस्जिद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नसीर अहमद फक्रद्दीन मुजावर काम पाहत आहेत. ती जुनी मस्जिद असल्याने धार्मिक विधीसाठी या मस्जिदीकडे मुस्लिम बांधवांचा ओढा अधिक असतो.
हुपरी परिसरात चार मस्जिदी आहेत. येथील स्मशानभूमीतील नैसर्गिक सान्निध्य लाभलेल्या आयेशा मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यास गर्दी करतात. येथील मुस्लिम समाज प्रामुख्याने चांदी व्यवसायाशी जोडला गेला आहे. रमजान महिन्यात धार्मिक विधीस मोठी उपस्थिती असते. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून गावात सलोख्याचे वातावरण निर्माण होत, असे मुस्लिम समाजाचे उमरसाहेब नदाफ यांनी सांगितले.
शिरोळ येथे जुनी मरकज मस्जिद असून, येथे धार्मिक विधी होत असतात. तसेच यादववाडीत इनाम मस्जिद, माळवाडीत रहमत नगरात मस्जिद उभारली आहे. धार्मिक शिक्षण देण्यासाठी तालुक्यातील मदरसा शिरोली येथे आहे. येथे सुमारे ७०० विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत. येथे नमाज पठण होते.
पेठवडगाव येथील वडगाव सार्वजनिक जुम्मा मस्जिद ही ‘जामा मस्जिद’ नावाने ओळखले जाते. या जुन्या मस्जिदीचे २५ वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे. मध्यवर्ती भाजी मार्केट परिसरात असणाऱ्या या मस्जिदीमध्ये रमजान महिन्यात मुस्लिम बांधवाची उपस्थिती अधिक असते. येथे तरावीह पठण मौलाना मुद्दीन मुजावर करतात. तर धार्मिक शिक्षण देण्यासाठी मकतब घेतला जातो. तो सकाळी ७ ते ९ या वेळेत असतो.
मस्जिदीचे अध्यक्ष गुलाब बागवान, उपाध्यक्ष आदिशहा फकीर, सेक्रेटरी हाजी हमजा मोमीन व अन्य सदस्य मस्जिद व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत आहेत.
तालुक्यातील लहान मोठ्या मस्जिदीतून तरवीह, नमाज पठण, आदी धार्मिक आचरणात मुस्लिम बांधव व्यस्त दिसतो. तसेच सामाजिक विविध मंडळे, व्यक्तीकडून होणारी इफ्तार पार्टी व सर्व धर्मियांचा सहभाग हा सामाजिक ऐक्य वाढीस बळकटी देणारा ठरत आहे.

जकात अनिवार्य
आपल्या उत्पन्नाच्या वार्षीक नफ्यातील अडीच टक्के जकात (वाटा) काढली जाते. ती समाजातील गोरगरिबांना दान कली जाते. अडीच टक्के जकातीच्या वसुलीतून इस्लाम धर्माची शिकवण देणाऱ्या ९० टक्के मदरशांना मदत केली जाते. या मदरशांमधून पवित्र कुरआन, शरीफ इस्लामिक कायदे, आदी बाबतचे ज्ञान दिले जाते.

Web Title: Century history of Hatkanangle mosque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.