शतकवीर रक्तदाते वसंतराव चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:53+5:302021-07-04T04:17:53+5:30
(फोटो-०३०७२०२१-कोल-वसंतराव चव्हाण) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सहकारातील नामवंत पतसंस्था म्हणून संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळविलेल्या वसंतराव चौगुले पतसंस्थेचे व्यवस्थापक ...

शतकवीर रक्तदाते वसंतराव चव्हाण
(फोटो-०३०७२०२१-कोल-वसंतराव चव्हाण)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहकारातील नामवंत पतसंस्था म्हणून संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळविलेल्या वसंतराव चौगुले पतसंस्थेचे व्यवस्थापक वसंतराव चव्हाण (बहिरेवाडी, ता. पन्हाळा) यांनी ३४ वर्षांत शंभरवेळा रक्तदान केले. विशेष म्हणजे स्वत: वर्षातून चार वेळा रक्तदान केलेच, त्याचबरोबर रक्तदान शिबिरे घेतली.
वसंतराव चव्हाण यांना रक्तदानाची ऊर्जा स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्याकडून मिळाली. तात्यासाहेब कोरे हे साखर कारखाना, वारणा दूध संघ व महाविद्यालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करत. येथून चव्हाण यांनी रक्तदानास सुरुवात केली. वसंतराव चौगुले पतसंस्थेत नोकरीला लागल्यानंतर त्यांचा सहवास संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांच्याशी आला. संस्थेचे संचालक डॉ. अरुण चौगुले यांनी रक्तदानाची अनेक रेकॉर्ड मोडली होती. त्यांच्याप्रमाणे ब्लड बँकेत विक्रमी रक्तदाता म्हणून नाव लागावे, असा आग्रह अध्यक्ष अनिल पाटील यांचा राहिला. चव्हाण यांनी शाहू ब्लड बँकेकडे ५० वेळा, त्याचबरोबर ‘सीपीआर, मिरज, बेळगाव, ‘रुबी’ व ‘टाटा’ हॉस्पिटल मुंबई येथेही रक्तदान केले. वर्षातून त्यांच्यासह पत्नी, मुलगी, पुतणे शिवजयंती, संस्थेचा वर्धापनदिन व मुलग्याच्या स्मरणार्थ या तीन वेळेला न चुकता रक्तदान करतात. गेल्या आठवड्यात त्यांनी शंभरावे रक्तदान करून नवीन रेकॉर्ड केले.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा रक्तदानाचा पायंडा
वसंतराव चौगुले पतसंस्थेचे शंभरहून अधिक कर्मचारी आहेत. मात्र, सेवेत घेतल्यापासून वर्षातून किमान एक वेळा तरी प्रत्येक कर्मचारी स्वेच्छेने रक्तदान करतोच.
कोट -
वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, उद्योगपती सुभाष चौगुले, सरव्यवस्थापक एम. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाचा हा टप्पा पार केला. माझे हे रेकॉर्ड इतरांनी मोडले पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. मानवी रक्ताला दुसरा पर्याय नसल्याने ‘लोकमत’ने रक्तदान माेहीम हातात घेऊन जगात भारी काम केले आहे.
- वसंतराव चव्हाण (शतकवीर रक्तदाते)