अपघाताचे केंद्रबिंदू ‘कमतनूर गेट’

By Admin | Updated: August 27, 2015 23:53 IST2015-08-27T23:53:15+5:302015-08-27T23:53:15+5:30

संकेश्वरातील वाहतूक समस्या : दिशादर्शक फलक मोडकळीस आल्याने त्याची दिशा बदलली

The center of the accident 'Kamatnur Gate' | अपघाताचे केंद्रबिंदू ‘कमतनूर गेट’

अपघाताचे केंद्रबिंदू ‘कमतनूर गेट’

विलास घोरपडे - संकेश्वर भागातील कमतनूर गेट मार्गावर यरगट्टी व जेवरगी हे कर्नाटकचे दोन राज्यमार्ग, तर महाराष्ट्रातील सांगली बाजारपेठेमुळे रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. यामुळे लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी ‘कमतनूर गेट’ म्हणजे डेंजर झोन अशी स्थिती बनली आहे.
संकेश्वर शहरापासून २ कि.मी. अंतरावरील कमतनूर गेट अर्थात ‘सर्कल’नजीक हॉटेल, ढाबा, वाईन्स शॉपच्या विळख्याने लोकांची वर्दळ असते. ग्रामीण भागातील नागरिकांचा संकेश्वर बाजारपेठेशी संपर्कासाठी जीप, टमटम, मॅक्सीकॅब आदी ‘वडाप’ यांचा वावर असतो. सोबत निडसोशी पॉलिटेक्निकमध्ये शालेय विद्यार्थी दुचाकीवरून वेगाने जात असतात. तथापि, सर्कलनजीक अरद रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे, दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. परिसरात कपराळ ओढ्याच्या वळणावर समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने नवख्या चालकांना रहदारीमुळे ब्रेक लावताना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
ऊस गळीत हंगामात हिरा शुगर (संकेश्वर), सतीश शुगर्स (हुणचाळ), ओम शुगर (जैनापूर)ची वाहतूक या मार्गावरूनच होते. सोबत परप्रांतातील सद्भक्त सौंदत्ती यल्लम्मा देवदर्शनास व गोकाक फॉल्स् येथे पर्यटनास जातात; पण सर्कलवर दिशादर्शक फलक मोडकळीस आल्याने त्याची दिशा बदलली आहे. यामुळे प्रवासी गोंधळून जातात.
कर्नाटकातील १२ क्रमांकाच्या संकेश्वर-विजापूर-जेवरगी या राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ नेहमीच असल्याने या राज्यमार्गास राष्ट्रीय मार्ग क्रमांक ४ मध्ये रूपांतर करून संकेश्वर-विजापूर रस्ता रुंदीकरण करावा, अशी मागणी गत दोन महिन्यांपूर्वी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.


उपाययोजना गरजेच्या
संकेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जानेवारी २०१५ ते जुलै २०१५ या सात महिन्यांच्या काळात २१ विविध ठिकाणच्या अपघातांत नऊ ठार, तर २१ जखमी झाले. त्यात काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याठिकाणी घडणाऱ्या अपघाताला पायबंद घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व कर्नाटक राज्य रस्ते विकास महामंडळाने संयुक्तपणे सर्कलनजीक असणारी दुकाने हटवून, रस्ता रुंदीकरण, मार्गावरील झुडपे हटविणे, चारही मार्गांवर दिशादर्शक फलक लावून दुभाजक बनविणे गरजेचे ठरणार आहे.

Web Title: The center of the accident 'Kamatnur Gate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.