‘फिरंगाई’चा शतकमहोत्सवी वर्षारंभ
By Admin | Updated: January 23, 2015 00:48 IST2015-01-22T22:50:10+5:302015-01-23T00:48:31+5:30
विविध कार्यक्रम : शंभर कार्यकर्त्यांचा मरणोत्तर नेत्रदान संकल्प, स्पर्धा, उपक्रम

‘फिरंगाई’चा शतकमहोत्सवी वर्षारंभ
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील फिरंगाई तालीम मंडळास यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संपूर्ण वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालमीचे अध्यक्ष व नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी आज, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शतकमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी (दि. २६) या शतकोत्तर उत्साहास १०० कार्यकर्त्यांचे मरणोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरले जाणार आहेत. याशिवाय शहरातील बेघर गरिबांना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय फेबु्रवारी महिन्यात शिवजयंतीनिमित्त किल्ले सिंधुदुर्ग येथून शिवज्योत आणली जाणार आहे. मार्च महिन्यात महिला दिनानिमित्त राजामाता जिजाऊ यांच्या जन्मदिनानिमित्त राजमाता तरुण मंडळास (धोत्री गल्ली तालीम मंडळ) ब्राँझ धातूचा पुतळा भेट देण्यात येणार आहे. हिंदू नववर्षानिमित्त तालमीच्या परिसरात सर्व घरांच्या प्रवेशद्वारावर उभ्या राहणाऱ्या गुढीला फिरंगाईदेवी नावाचे वस्त्र अर्पण केले जाणार आहे. एप्रिल महिन्यात फिरंगाईदेवी पालखी सोहळ्यानिमित्त नूतनीकरण झालेल्या इमारतीचा वास्तुप्रवेश व परिसर स्वच्छता अभियान घेतले जाणार आहे. १ मे निमित्त मोटारसायकल रॅली व चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाणार असून, ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान व २६ जूनला शाहू महाराज जयंतीनिमित्त प्राचीन काळातील नाणी व पोस्टाची तिकिटे यांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. १५ आॅगस्टनिमित्त वृद्धाश्रमास जिलेबी वाटप होणार आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, पानसुपारी आणि आॅक्टोबरमध्ये फिरंगाई देवीच्या भक्तांसाठी प्रसाद वाटप होणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा मोहरम सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. कार्यक्रम व स्पर्धा समिती निर्माण केली आहे. २६ जानेवारीला खासदार धनंजय महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शतकमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमांचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी नंदकुमार तिवले, चंद्रकांत जगदाळे, उदय माने, मनोज चव्हाण, प्रताप माने, विक्रम पाटील, अभिजित खांडेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘फिरंगाई’ नाव असे पडले...
महाकाली देवीची साहाय्यकारिणी आणि त्वचारोगहारिणी देवी म्हणजेच प्रियंगाई देवी. या देवीचे मूळ ठिकाण बलुचीस्तान भागात आहे; तर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत वरुणतीर्थजवळसुद्धा तांदळा रूपातील प्रियंगाई देवीचे पुरातन मंदिर आहे. मुस्लिम राजवटीत मुस्लिम भक्तांनी म्हणजेच फिरंगी लोकांनीसुद्धा या देवीची उपासना केल्यामुळे या प्रियंगाई देवीस लोक ‘फिरंगाई’ असे म्हणू लागले. या देवीचे अस्तित्व असलेली तालीम म्हणजेच फिरंगाई तालीम मंडळ आहे. या तालमीची स्थापना राजर्षी शाहू महाराजांचे सहकारी शीघ्रकवी लहरी हैदर यांनी केली. महाराजांनी युवकांचे शरीर तंदुरुस्त राहावे, याकरिता कोल्हापुरात विविध तालमी स्थापन केल्या. या तालमीत शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक, शाहीरशार्दूल भाऊसाहेब पाटील, जर्मनीला जाऊन कला दाखविणारे शाहीर नानिवडेकर, शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, नामवंत कवी ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या उमेदीच्या काळात या तालमीत काही काळ व्यतीत केला आहे. तसेच डाव्या विचारसरणीचे व कष्टकरी, कामगारांचे नेते प्रा. विष्णुपंत इंगवले, सदाशिवराव जगदाळे, आदी मंडळी याच तालमीच्या मुशीतून तयार झाली.
शतकमहोत्सवी फिरंगाई तालीम मंडळाच्या स्थापनेनंतर काही कालावधीत घेतलेल्या छायाचित्रात तत्कालीन मंडळींसह पाठीमागे फिरंगाई तालीम मंडळाची जुनी इमारत.