स्वस्त धान्य दुकानातील तांदळात सिमेंटचे तुकडे
By Admin | Updated: November 25, 2014 00:30 IST2014-11-25T00:13:58+5:302014-11-25T00:30:35+5:30
राजगोळीतील घटना : लाभार्थ्यांचा दुकानसमोर ठिय्या : तलाठ्याकडून पंचनामा

स्वस्त धान्य दुकानातील तांदळात सिमेंटचे तुकडे
कोवाड : येथून जवळच असलेल्या राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील भरमलिंग सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य रेशन वाटप दुकानातील तांदळाच्या पोत्यातून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे व बुरशी आलेले गहू सापडल्याने प्रचंड गोंधळ उडाला; पण असे खराब धान्य घेण्यासाठी दुकानदार लाभार्थ्यांवर जबरदस्ती करू लागल्याने वैतागलेल्या धान्य लाभार्थ्यांनी दुकानासमोरच ठिय्या मांडून आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन धान्य वाटप तत्काळ बंद पाडले, तर पुरवठा विभागाकडे तक्रार करून तलाठी संतोष पाटील यांना पंचनामा करायला भाग पाडले.
येथील स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये नेहमीप्रमाणे आज, सोमवारी सकाळपासून धान्य वाटप चालू होते; पण दुपारी दोन ते तीनच्या सुमारास तांदळाच्या पोत्यामधून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे आढळून आले. त्यामुळे असे सिमेंटमिश्रित धान्य घेण्यास महिलांनी नकार दिला; पण दुकानदाराने याची दखल न घेताच धान्य हवे तर घ्या, नाही तर निघून जा, अशी धकमी दिली. त्यामुळे उपस्थित महिला संतप्त झाल्या.
याची चर्चा गावात होताच आणखी महिलावर्ग दुकानासमोर जमा झाला. तरीही दुकानदार अरेरावी करीत असल्याने महिलांनी धान्य घेण्यास नकार देऊन दुकानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
ही बातमी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुरेश पाटील, कोवाड शहरप्रमुख अशोक मनवाडकर यांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन तांदूळ पोत्यांची तपासणी केली. यावेळी गव्हाच्या पोत्यांची तपासणी केली असता गहू ही बुरशी आलेले होते. या संदर्भात दुकानदाराला जाब विचारला असता, पुरवठा विभागाकडूनच अशाप्रकारचे धान्य वितरित केले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घालून तांदूळ व
गव्हाच्या पंचनाम्याची मागणी
केली. शेवटी तलाठी संतोष
पाटील यांनी घटनास्थळी येऊन
धान्य पोत्यांचा पंचनामा केला. (वार्ताहर)
शिवसेना व लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून राजगोळी बुद्रुक येथील रेशन धान्य दुकानातील तांदूळ व गहू पोत्यांचा पंचनामा करण्यात आला. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार डी. एम. नांगरे यांनी दिली.
रेशन धान्य दुकानांना वारंवार अशा प्रकारचा खराब तांदूळ व गव्हाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे लाभार्थ्यांना नाईलाजास्तव हे धान्य खरेदी करावे लागते.